आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादेत 155 किलोच्या महिलेची सुखरूप प्रसूती, वैद्यकीय क्षेत्रात जगभरातील अशी ही सातवी केस

औरंगाबाद / रोशनी शिंपी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधुमेह, उच्च रक्तदाब असल्याने दोन महिन्यांपासून घाटीत अॅडमिट करून देखरेख

तब्बल १५५ किलाे वजनाच्या एका २८ वर्षीय महिलेची अतिशय गुंतागुंतीची प्रसूती औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (घाटी) डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूपपणे केली. वैद्यकीय जर्नल्समध्ये आजवर अशा प्रकारच्या फक्त ६ केसेसची नोंद आहे. गुड्डी जगातील अशी सातवी महिला ठरणार आहे, असे प्रसूती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात जगभरातील अशी ही सातवी केस
औरंगाबादच्या मिसारवाडीची रहिवासी असलेल्या गुड्डीच्या प्रसूतीचा प्रवास दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला. डॉ. विजय कल्याणकर यांनी पहिल्यांदा तिला तपासले. गुड्डीची केस इतरांपेक्षा निश्चितच वेगळी हाेती. कारण उपलब्ध असलेल्या वजन काट्याच्या पार जाणारे तिचे वजन होते. गुड्डीला मधुमेह, उच्च रक्तदाबही होता. अशा वेळी प्रसूती करणे आव्हानात्मक होते. डॉ. कल्याणकर यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले. विभागप्रमुख डॉ. गडप्पा यांनीही विशेष प्रयत्न करण्यास आपल्या सहकारी डाॅक्टरांना परवानगी दिली.
सर्वार्थाने क्लिष्ट प्रसूती : गुड्डी एकाच जागी बसून राहत होती. त्यामुळे वाॅर्डात तिला दररोज चालवण्यास सांगितले जात हाेते. फुप्फुसाचे व्यायाम करून घेण्यात आले.

शरीराच्या विविध भागांवर बुरशीचा संसर्ग होता. चरबी प्रचंड असल्याने बाळाचे ठोके ऐकूच येत नव्हते. याकरिता दिवसभरातून तीन वेळा सोनोग्राफीच्या माध्यमातून बाळाचे ठोके तपासले जात हाेतेे. तिला एका जागेवरून दुसरीकडे हलवण्यासाठी मदतीची गरज होती. प्रचंड वजनामुळे तिला सांभाळणे कठीण होते. व्हीलचेअरमध्येदेखील ती मावत नव्हती. नेमके वजन किती हे जाणून घेण्यासाठी अखेर मोंढ्यात पोती माेजली जातात तसा काटा आणण्यात आला. कारण वजन कळल्याशिवाय औषधांची मात्रा किती असावी हे ठरवता येणार नव्हते.

सिझेरियनसाठी दोन टेबल जोडले
गुड्डीची प्रसूती करण्यासाठी दोन ऑपरेशन टेबल जोडून शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. प्रसूतीसाठी तिच्या आकाराचा गाऊन शिऊन घेतला. २४ जानेवारीला तिचे यशस्वी सिझेरियन झाले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.

सामान्यत: ४० मिनिटांत सिझेरियन प्रसूती होते. या केसमध्ये मात्र अडीच तास शस्त्रक्रिया चालली. अशा केसेसमध्ये रक्ताच्या गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष इंजेक्शनचा डोसही तिला देण्यात आला.

डॉ. गडप्पा याच्या मार्गदर्शनात डॉ. विजय कल्याणकर, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड यांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचिता जोशी, डॉ. प्रशांत पाचोरे आणि डॉ. सय्यद अनिसा यांनी मदत केली. याशिवाय निवासी डॉक्टर डॉ. अमिता काकडे, डॉ. प्रतीक्षा कांदळकर, डॉ. चेताली पांडव, डॉ. एेश्वर्या चंदवाडे, डॉ. हर्षिता एस., डॉ. दिप्ती आनंद, डॉ. अपूर्वा खाटोकर, डॉ. धनश्री पाटील यांच्यासह सिस्टर सुनीता अस्वले, रंजना घुगे, तृप्ती पादळे, रिबेका खंडागळे, चंद्रकला चव्हाण, विद्या निकुंभ, दीपक शिराळ, शकील यांनीही सहकार्य केले.

डॉक्टरो की वजह से जिंदा हूँ....
घाटीच्या वॉर्ड २६ मध्ये ११ दिवसांची बाळंतीण गुड्डी निवांतपणे बसलेली होती. गुड्डी सांगत होती, ही माझी दुसरी प्रसूती आहे. यापूर्वीची प्रसूती २०१७ मध्ये झाली होती. वयाच्या १६ व्या वर्षांपासून अचानकच वजन वाढत गेले. २०१४ मध्ये विवाह झाला तेव्हा ९० किलो वजन होते. वजनामुळे आजारही वाढले, आयुष्य कठीण झालेले होते.

पण, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत माझी प्रसूती केली. शासकीय रुग्णालयात हाल होतात, तुमच्याकडे कुणीच पाहत नाही असे ऐकायला मिळते. पण, माझ्यासाठी डॉक्टरांची फौजच रात्रंदिवस काम करत होती. ‘डॉक्टरो की वजह से मै और बच्चा जिंदा हूँ’ असे ती भरल्या डोळ्याने सांगत होती. मात्र, तिच्या डाेळ्यात आनंदही झालेला दिसत हाेता.

- महिलांचा बॉडी मास इंडेक्स २० ते २५ दरम्यान असतो. मात्र, गुड्डीचा बीएमआय ६६ हाेता. - रक्तदाब मोजण्याच्या यंत्रात दंड मावत नव्हता म्हणून खास उपकरण आणावे लागले. - वजन मोजण्यासाठीही माेंढ्याप्रमाणे माेठा वजन काटा आणण्यात आला. सिझेरियनसाठी दाेन माेठे टेबल जाेडावे लागले. - गुड्डीने ३.५ किलाे वजनाच्या मुलाला जन्म दिला. तिचे हे दुसरे अपत्य आहे.

बातम्या आणखी आहेत...