आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जन्मशताब्दी विशेष:साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंचे ‘साहित्य’च अद्याप अप्रकाशित, नव्या दोन खंडांचे प्रकाशन दोन वर्षांपासून रखडले

औरंगाबाद | शेखर मगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समिती जानेवारीत बरखास्त, जुन्या खंडांच्या प्रती संपल्या

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या हयातीतही त्यांच्या वाट्याला उपेक्षांचीच श्रीमंती होती. राज्यकर्ते एकीकडे भाषणांतून अण्णा भाऊंच्या प्रतिभेचा गौरव करतात. तर दुसरीकडे मात्र त्यांच्या साहित्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात. याची प्रचिती देणारी तीन उदाहरणे ‘दिव्य मराठी’ने शोधून काढली आहेत. पहिले उदाहरण म्हणजे, त्यांच्या दुर्लक्षित साहित्याला प्रकाशित करणाऱ्या चरित्र, साधने प्रकाशन समितीला महाविकास आघाडी सरकारने जानेवारी-२०२० दरम्यान बरखास्त केले आहे. दुसरे, शासनाच्या प्रकाशित खंडांच्या सर्व प्रती संपल्या असून त्याचे पुनर्मुद्रण केले जात नाही. अन् तिसरे उदाहरण म्हणजे, दोन नव्या खंडांचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरीही हे खंड बाजारात आणले जात नाहीयेत.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ संपताना म्हणजेच १६ जून २०१४ रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ चरित्र-साधने प्रकाशन समिती गठित केलेली होती. बाबासाहेबांच्या चरित्र व साधने प्रकाशन समितीप्रमाणेच या समितीचेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अध्यक्ष असतात. नोव्हेंबर-२०१४ मध्ये सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पण समिती पुढील तीन वर्षांपर्यंत त्यांनी अस्तित्वात ठेवली होती. समितीने अखंडपणे काम करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ‌्मय (कादंबरी) खंड-१ आणि खंड-२ अशा दोन ग्रंथांची निर्मिती केली. पहिल्या खंडांत ९ कादंबऱ्या तर दुसऱ्या खंडात १० कादंबऱ्यांचा समावेश आहे. १ मे २०१७ रोजी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या दोन खंडांचे प्रकाशनही केले गेले. ८९० आणि ९२२ पृष्ठसंख्या असलेल्या या दोन्ही खंडांची प्रत्येकी किंमत फक्त १२५ रुपये आहे. त्यामुळे वर्षभरातच या ग्रंथांच्या २० हजार कॉपी साहित्यप्रेमींनी खरेदी केल्या. त्यानंतर २०१८ ला दोन्ही खंडांचे पुनर्मुद्रण करून अण्णा भाऊंचे साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची होती. पण तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी समितीचे पुनर्गठन करण्यातच वेळ घालवला. १ जुलै २०१९ रोजी नवी समिती अस्तित्वात आणली. या समितीनेही उत्तम काम करून खंड-३ आणि खंड-४ चे सर्व काम करून ठेवलेले आहे. कादंबरी आणि कथासंग्रहांचे हे खंड सामान्य ग्रंथप्रेमींना स्वस्तात उपलब्ध करून देणे समितीचे काम आहे. पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे दोन्ही खंड दोन वर्षे झाली प्रकाशित केलेले नाहीयेत.

स्वपक्षीयांसाठी समिती बरखास्त
समितीचे विद्यमान अध्यक्ष उदय सामंत आहेत. राज्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. प्रधान सचिव, उच्च शिक्षण संचालक आणि शासकीय मुद्रणालयाचे संचालक समितीचे शासकीय सदस्य आहेत. त्याशिवाय पुण्यातील उत्तम बंडू तुपे, धर्मराज साठे, दादासाहेब सोनवणे, डॉ. सुनील भंडगे, संपत जाधव, जालिंदर कांबळे, नांदेड येथील शिवाजी कांबळे, पिंपरी-चिंचवड येथील शाहीर अवघडे, कन्नड येथील आंबाराव सगट, जालन्यातील डॉ. दिलीप अर्जुने, ठाणे येथील डॉ. सुवर्णा रावळ, मुंबईचे बळीराम गायकवाड, अमरावती येथील नामदेव कांबळे आणि धोंडीराम वाडकर आदींचा समितीत समावेश आहे. पण जानेवारीमध्ये राज्य सरकारने सर्व समित्या बरखास्त करण्याची घोषणा केली होती. त्या वेळी ही समितीही बरखास्त केली आहे. आता सत्तांतर झाल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना समितीत स्थान देण्यासाठी समिती बरखास्त केली आहे.

समिती गठित करण्याचे प्रस्ताव विचाराधीन
जानेवारीत शासनाने सर्व समित्या बरखास्त केलेल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी म्हणजे मार्चमध्ये समिती स्थापन करण्याचे प्रस्तावही शासनाकडे दिलेले आहेत. लवकरच त्यावर निर्णय होऊन समिती गठित झाली तर तातडीने साहित्य प्रकाशित करू. त्यात फारसा वेळ लागणार नाही. -डॉ. डी. आर. माने, संचालक, उच्चशिक्षण विभाग, पुणे

समितीत कुणालाही घ्या, पण साहित्य प्रकाशित करा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना मी स्वत: दोन वेळा भेटलो. समितीत कुणालाही घ्या, पण आधीच्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करा व अप्रकाशित ग्रंथ प्रकाशित करण्याची विनंती केली.ऑगस्ट उजाडला पण काहीच काम झाले नाही. शताब्दी महोत्सव साजरा करताना त्यांचे साहित्यच बाजारात नाहीये. २० ऑगस्टपर्यंत साहित्य प्रकाशित करता येईल. -शिवाजी कांबळे, नांदेड