आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
वर्धा येथे साहित्य संमेलन होणार असल्याने ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी हे संमेलन होणार आहे.
विदर्भाला मान
आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला मिळाला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांशी नाळ जोडणाऱ्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी मागणी होती. त्यासाठी सुरेश द्वादशीवार यांचे नाव चर्चेतही होते.
विपुल वैचारिक लेखन
चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२ मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्तही आहेत.
चपळगावकरांची पुस्तके
- अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व
- आठवणीतले दिवस
- कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
- कायदा आणि माणूस
- कहाणी हैदराबाद लढ्याची
- तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
- तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
- त्यांना समजून घेताना (ललित)
- दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
- नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
- नामदार गोखल्यांचं शहाणपण
- न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
- न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
- मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
- महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
- राज्यघटनेचे अर्धशतक
- विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
- संघर्ष आणि शहाणपण
- समाज आणि संस्कृती
- संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
- सावलीचा शोध (सामाजिक)
- हरवलेले स्नेहबंध
सन्मान आणि पुरस्कार
- पुण्यात २१-२२ जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २६ वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.
- भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)
- औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालेल्या ९ व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
कसे होईल संमेलन?
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, वर्धा येथे होईल. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. संमेलनाचे उद्घाटन ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजवंदन करण्यात येईल. संमेलनात मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
ग्रंथप्रदर्शनात ३०० गाळे
ग्रंथप्रदर्शनात साधारण ३०० गाळे असतील. त्याचे उद्घाटन २ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्वाध्यक्षांच्या हस्ते होईल. प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि यांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने ३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. संमेलनाचा समारोप ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.