आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ध्यात 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा राजकीय नेत्यांचा राबता पाहायला मिळणार आहे. संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर आणि सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. त्यामुळे संमेलनात राजकीय कलगीतुरा रंगणार का, याची उत्सुकता लागलीय.
साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. यात उद्घाटनापासून समारोपापर्यंत राजकीय नेत्यांचा भरणा असल्याने पुन्हा एकदा संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेते असावे की, नसावे यावरून वादंग उठण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादचे संमेलन अपवाद
उस्मानाबादमध्ये 10 जानेवारी 2020 रोजी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. विशेष म्हणजे हे संमलेन अराजकीय ठरले. कारण उद्घाटन सोहळा ते समारोप या दोन्ही कार्यक्रमात व्यासपीठावर राजकीय व्यक्ती नव्हते. जे कोणी राजकीय नेते येतील ते रसिक असतील. साहित्य संमेलनाचे निमंत्रण सर्वांना आहे. मात्र, हा मराठी साहित्याचा आणि साहित्यिकांचा हा सोहळा आहे, असे म्हणत साहित्य महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष कौतिकराव ठाले - पाटील यांनी उदघाटन आणि समारोपाला राजकीय नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिले नव्हते. स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख प्रेक्षकांमध्ये बसले होते.
नंतर मात्र विसर
उस्मानाबाद नंतर इतर ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटन आणि समारोपाला सर्रास राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली. विशेष म्हणजे कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यकाळात नाशिक, उदगीरला साहित्य संमेलन झाले. या ठिकाणी शरद पवार, छगन भुजबळ, सुभाष देसाई ते इतर राजकीय नेत्यांचा राबता दिसून आला. आता त्याचीच पुनरावृत्ती वर्धा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात दिसून येत आहे.
उदघाटन कार्यक्रम असा
वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार आणि स्वागताध्यक्ष दत्ताजी मेघे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित राहणार आहेत.
समारोप कार्यक्रम असा...
संमेलनाचा समारोप रविवार, 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे संमेलनाचे उदघाटन आणि समारोपाला राजकीय नेत्यांची नावेच जास्त आहेत. त्याची चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.