आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैन्यातून निवृत्तीनंतर सुरक्षा रक्षक बनण्याचा पायंडा तीस जवानांनी मोडीत काढला. सैन्याच्या सिग्नल युनिटमधून २०१३ मध्ये निवृत्त झालेल्या अनिल शिंदे यांनी २०१९ मध्ये महाउद्योग लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी स्थापन केली. या उद्योगाच्या माध्यमातून शंभर जणांना रोजगार मिळाला. प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे दीड कोटी भागभांडवलाद्वारे सुरू केलेल्या उद्योगाची उलाढाल काही कोटींवर पोहोचली आहे. मसाले, लोणचे, चटण्या आणि ड्रायफ्रूट्सच्या त्यांच्या उत्पादनास राज्यभरातून लाखोंच्या ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली आहे.
निवृत्तीनंतर माजी सैनिक अरुण शिंदे यांनी सहा वर्षे उद्योगाचा अभ्यास केला. तीस माजी सैनिकांना एकत्र करून प्रत्येकी पाच लाख रुपये गुंतवणूक केली. रजिस्टर ऑफ कंपनी अंतर्गत केंद्राच्या कॉर्पोरेट असोसिएट्स विभागात नोंदणी केली. राजस्थानच्या कोटा येथून आवश्यक मशिनरी आणली. जमीन खरेदी केली. २०१९ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली. उत्पादन सुरू करून आता अडीच वर्षे झाली आहेत. तीन यशस्वी वार्षिक ऑडिट पूर्ण झाल्यानंतर कंपनीस नाबार्डच्या सुविधा प्राप्त होतील. सैन्याच्या सीएसडी कॅन्टीनमध्ये विक्रीसाठी कंपनीने उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ प्राप्त होणार आहे. भविष्यात कंपनी शेती महामंडळाची पन्नास ते शंभर एकर जमिनीवर करार पद्धतीने शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.
प्रशिक्षण व सुविधा पुरवून डिफेन्स टुरिझम सुरू करण्यावर दिला जातो भर माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करण्यापेक्षा सन्मानाने जगता यावे हा यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी सैनिकांच्या माध्यमातून बचत गट सुरू केले आहेत. त्यांना प्रशिक्षण व सुविधा पुरवून डिफेन्स टुरिझम सुरू करण्यावर ते काम करीत आहेत. देशी आणि विदेशी पर्यटनासाठी नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी एका छताखाली घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सोयी-सुविधा पुरवल्या जातील. सैन्यातील निवृत्तीनंतर सुरक्षा रक्षकाचे लागलेले लेबल पुसून काढून मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केल्याचे निवृत्त सार्जंट दीपक पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.