आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:मराठवाड्यात सर्वदूर संततधार; उस्मानाबाद, हिंगोली, नांदेडमध्ये सूर्यदर्शन नाही, जालन्यात पिकांवर रोगराई

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली : जिल्ह्यात सरासरी 16 मिलिमीटर पाऊस

मराठवाड्यात बुधवारी उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, हिंगाेलीत संततधार सुरू हाेती. या पावसामुळे पिकांना चांगला फायदा हाेत अाहे. नांदेडमध्ये तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात अाला अाहे. काही ठिकाणी सूर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडण्याची भीती व्यक्त हाेत अाहे. जालना शहरात तर दुपारनंतर पावसाचा जाेर जास्त असल्याने मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत हाेते. लातूर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात ओढ दिलेल्या पावसाने दुसऱ्या आठवड्यात जोरदार पुनरागमन केले.

जालना : सखल भाग आणि रस्त्यांवर साचले पाणी
जिल्हाभरात बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सुरू झालेला संततधार पाऊस सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरूच होता. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते, तर सखल भागात पाणी साचल्यामुळे जणू जागोजागी तलावाचे रूप आले होते. मागील आठवडाभरापासून कमी-अधिक सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे शेतात वाफसा नाही. यामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. तसेच शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिके पिवळी पडू लागली आहे. तसेच अार्द्रतायुक्त वातावरणामुळे पिकांवर रोगराई पडत आहे. दरम्यान, जालना शहरातील शनिमंदिर, टाऊन हॉल, पाणीवेस, शिवाजीपुतळा आदी भागात नाल्या तुडुंब भरल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.

नांदेड : विष्णुपुरी धरणाचा पुन्हा एक दरवाजा उघडला
मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे. मध्येच पावसाचा कमी जास्त जोर वाढत होता. नद्या, नाल्या वाहत आहेत. तसेच रस्त्यांवर पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस राहिल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, किनवट तालुक्यातील शनिवार पेठ कोठारी पुलावरून रात्री साडेसातच्या सुमारास पाणी गेल्याने मार्ग बंद झाला होता. किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुखेड, धर्माबाद, अर्धापूर आदी तालुक्यांत जोदार पाऊस झाला. दरम्यान, परभणी जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याची आवक सुरूच असल्याने एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यामधून ४५२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यात सरासरी २९.२ मिमी पाऊस झाला.

हिंगोली : जिल्ह्यात सरासरी १६ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात मागील २४ तासांत हलका ते मध्यमस्वरूपाच्या पाऊस झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत पाऊस सुरू होता. सरासरी १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे ः हिंगोली तालुका १५.७० मिलिमीटर (४६८.७०), कळमनुरी १७ (४९७.१०), वसमत २१.३० (४७३.६०), औंढा नागनाथ १२.४० (५५६.६०) तर सेनगाव तालुक्यात १३.५० मिलिमीटर (४४५.३०) पावसाची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : तुळजापुरातील मोर्डा तलाव ओव्हरफ्लो
जिल्ह्याला रविवारपासून म्हणजे सलग चौथ्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. उस्मानाबादेत मंगळवारी रात्रभर पावसाच्या सरी बरसत होत्या. तुळजापूर तालुक्यातील मोर्डा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला. जुलै महिन्यात साठवण तलाव भरण्याची पहिलीच वेळ आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळात दहा-बारा दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २०.४ िमलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोहारा तालुक्यात सर्वाधिक २८.८ तर तुळजापूर तालुक्यात २८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...