आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:विक्रीचा परवाना नसतानाही लाखोंच्या बियाण्यांची विक्री ; सीड्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी नसतानादेखील गुजरातमधील कच्छ येथील आलमदार सीड्स या बी-बियाण्यांच्या कंपनीने राज्यात लाखोंच्या बियाण्यांची विक्री केली. हा प्रकार गुणवत्ता नियंत्रण कक्षाच्या नवीन मोंढ्यातील पाहणीत समोर आल्यानंतर कंपनीचे संचालक प्रफुल्ल भवन चव्हाण यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी ९ लाखांचे बियाणे जप्त करण्यात आले.

विभागीय कृषी संचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून बियाणे उत्पादनावर नियंत्रण ठेवले जाते. यात उत्पादन व विक्री केंद्राची तपासणी केली जाते. काही दिवसांपूर्वी विभागाचे बियाणे निरीक्षक व विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आशिष काळुशे यांच्या पथकाने नवीन मोंढ्यात काही व्यापाऱ्यांच्या दालनात तपासणी केली होती. यात उमेश सोनी यांच्या विक्री केंद्रात आलमदार सीड्सच्या उत्पादित ५१ वाणांचे बियाणे विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. कंपनीद्वारे बिल व प्रिन्सिपल सर्टिफिकेट प्राप्त न झाल्याने साेनी यांनी त्याची विक्री थांबवली होती. विभागाने कंपनीच्या विक्री प्रतिनिधीला सुरुवातीला परवाना सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संशय वाढला. काळुशे यांनी कंपनीला नोटिस बजावून खुलासा मागवला.

चौकशीत कंपनीकडे महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा कुठलाच परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे उत्पादक कंपनीने विनापरवाना बियाण्याची विक्री करण्याचा प्रयत्न करून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल होताच होळकर यांना कंट्रोल रूमला पाठवले क्रांती चौक ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे रजेवर असल्याने दुय्यम निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्याकडे ठाण्याच्या निरीक्षक पदाचा पदभार होता. बियाण्याचा गुन्हा दाखल होताच होळकरांना तात्पुरत्या स्वरुपात कंट्रोल रूमला पाठवण्यात आले. त्याचे कारण समोर आले नसले तरी हा गुन्हा दाखल होताच वरिष्ठांनी निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...