आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा मुलांनी विविध राजकीय पक्ष व संघटनेत नुसते मोठेपणा घेऊन मिरवू नये. तर, उच्च शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग व व्यवसाय आदींसाठी परिश्रम घ्यावे. त्यातूनच गरीबी दूर होईल, यासाठी संभाजी ब्रिगेड 'नवा विचार नवी दिशा' हे अभियान राज्यभर राबवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेड राज्यभर बिजनेस कॉन्फरन्स घेईल. यातून प्रबोधन व सर्वतोपरी मदत केली जाईल, तरुणांना नोकरीदेखील दिली जाईल, अशी माहिती गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तरुणांनी व्यवसायाकडे वळावे
गायकवाड शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मराठा तरुणांनी राजकीय पक्षांसाठी तोडफोड तोडफोड करणे बंद करावे. स्वतः उद्योग, व्यवसायात उतरावे. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी वाटचाल करावी. इतर तरुणासमोर आदर्श निर्माण करावा, यासाठी परिश्रम घेण्याची नितांत गरज आहे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. मराठा समाज पुढारलेला समाज म्हणून गणला जातो. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित राहत आहे. या भरवशावर आपण किती दिवस राहणार आहोत. यापेक्षा गरिबीवर मात करण्यासाठी व समाजाच्या उद्धारासाठी मराठा तरुणांनी शिक्षणाबरोबरच, अर्थकारण, व्यवसायाकडे वळणे नितांत गरजेचे आहे.
सर्व मार्गदर्शन करणार
गायकवाड म्हणाले, व्यवसायासाठी संधी कुठे आहेत, तुम्ही काय करायला हवे, त्यासाठी जो काही खर्च, मनुष्यबळ लागणार आहे याबाबत संभाजी ब्रिगेड तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. तुम्हाला नुसता मार्ग दाखवणार नाही तर त्या मार्गाने कसे चालायचे, यशस्वी व्हायचे हेही सांगितले जाणार आहे. यासाठी आम्ही 19 बिझनेस कॉन्फरन्स घेतले आहेत. या माध्यमातून 300 मराठा तरुणांना महाराष्ट्र ते विविध प्रदेश आणि परदेशात देखील बिजनेस सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ते आज इतरांसाठी आदर्श ठरत आहेत.
गायकवाड यांनी सांगितले, राज्यभर टप्प्याटप्प्याने बिजनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथेही हॉटेल आंबेसेडरमध्ये बिझनेस कॉन्फरन्स लवकरच घेण्यात येईल. तत्पूर्वी सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी येथे बिझनेस कॉन्फरन्स आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.