आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा संभाजीनगरचा नारा:सत्ता संकटात येताच संभाजीनगरची हाक; हा आजवरचा अनुभव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २० दिवसांतच शिवसेनेचा यू टर्न

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने २० दिवसांतच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून यू टर्न घेतला आहे. ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, आधी या शहराचा विकास करू आणि नंतर नामांतर होईल. आता मविआ सरकार अडचणीत आले असताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी संभाजीनगरची मागणी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसमोर केली. बुधवारी पुन्हा होणाऱ्या बैठकीत या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ३५ वर्षांपूर्वी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण जाहीर केले. १९९५मध्ये शिवसेना-भाजपची राज्यात सत्ता आल्यावर तसा निर्णयही झाला. मात्र, त्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाली. निर्णयाला स्थगिती मिळाली. पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने नामांतराचा निर्णय मागे घेतल्याने याचिका निकाली निघाली. २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले. पण पाच वर्षांत काहीही घडले नाही. अडीच वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री होताच पुन्हा नामांतराचा मुद्दा निघाला. शहराचे नाव बदलले जाणार, अशी चिन्हे दिसत असतानाच ८ जून रोजीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी ‘आधी शहराचा विकास, मग नामांतर’ अशी ठाम भूमिका जाहीर केली. त्यावर भाजपने टीकास्त्र सोडले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने काँग्रेससमोर शरणागती पत्करली, असाही आरोप होऊ लागला. पण त्याकडे शिवसेनेकडून दुर्लक्ष होत होते. गेल्या दहा दिवसांतील घडामोडीत मविआ सरकार अडचणीत आले आणि परिवहनमंत्री परब यांनी पुन्हा नामांतराचा मुद्दा आणला.

अभिमानाचा निर्णय
शिवसेनेने पहिल्यापासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची भूमिका कायम मांडली आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर हाच आग्रह धरला आहे. मंत्रिमंडळात याचा निर्णय होणार असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासाठी आनंदाचा निर्णय असणार आहे.
- अंबादास दानवे, आमदार शिवसेना

काँग्रेसचा संभाजीनगरला विरोधच
काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार ज्या मुद्द्यावर बनवले त्यामध्ये संभाजीनगरचा समावेश नाहीच. काँग्रेसचा औरंगाबाद, उस्मानाबाद, रामपूर या नामांतराला विरोधच आहे. स्वातंत्र्यावेळी ज्या गावांची जी नावे होती तीच कायम ठेवली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे.
-हिशाम उस्मानी, शहराध्यक्ष, काँग्रेस

राष्ट्रवादीकडून स्वागत
महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे. अनेकांनी असा निर्णय होऊ शकत नाही असे सांगितले तरी महाविकास आघाडी सरकारने ते करून दाखवले. यापेक्षा मला अधिक काहीही सांगायचे नाही.
-आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

उशिरा शहाणपण सुचले
शहराच्या नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारने घेऊन केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. गेल्या अडीच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेला ते करता आले नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदार सोडून जात असताना उशिराचे शहाणपण सुचले आहे. अर्थात नामांतराच्या निर्णयाचा आनंदच आहे.
-अतुल सावे, आमदार, भाजप