आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली, ती उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभेच्छा : समीर वानखेडे

औरंगाबाद / नितीश गोवंडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज बाळगणे व सेवन केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर सध्या टीकेची झोड उठली आहे. अल्पसंख्याक विकास व उद्याेजकता मंत्री नवाब मलिकांपासून अनेक राजकारणी त्यांच्यावर विविध आरोप करत आहेत. मलिकांनी तर वानखेडेंना वर्षभरात त्यांची नोकरी जाईल, अशी धमकीच दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये प्रथमच वानखेडे यांनी ‘दिव्य मराठी’ शी विशेष बातचीत केली. त्यात ते म्हणतात, ‘माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली असून ती ‌कुणालाही उतरवणे शक्य असेल तर त्यांना शुभेच्छा!’ या वेळी त्यांनी यापूर्वी दाऊदच्या भावावर केलेली कारवाई, आर्यन खान प्रकरण यासह अनेक मुद्द्यांवर मांडलेली ही मते....

सुरक्षा यंत्रणा सशक्त असताना ड्रग्ज देशात येतातच कसे?
यावर बाेलताना वानखेडे म्हणाले की, ड्रग्ज हा खूप आर्थिक फायदा देणारा अवैध व्यवसाय आहे. ते देशात विमान, रेल्वे, जहाज, रस्ते मार्गांनी आणले जातात. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे सर्व राेखण्याची जबाबदारी एनसीबीची आहे. ती आम्ही पार पाडत आहाेत.

- दुबईला कधी गेलेलाे नाही, लाॅकडाॅऊन असताना परदेशी जाणार कसा : मुळात खंडणी हा खूप वाईट शब्द आहे. मी आपातर्यंत दुबईला कधीच गेलेलो नाही. त्यामुळे या आरोपात काहीच तथ्य नाही. मालदीवला मुलांसह काैटुंबिक सहलीवर गेलाे हाेताे. ते देखील नियमांनुसार वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन. ताे काही गुन्हा ठरताे का? स्वत:च्या पैशाने, विमानातून सर्वसाधारण वर्गाने प्रवास केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी कसा परदेश प्रवास करणार, हे तरी सांगा. एवढ्या मोठ्या मंत्र्याने विचार करून आरोप करावेत. अधिकारी आहे म्हणजे तो भ्रष्टाचारीच असणार, असा एकच विचार त्यांना सुचताे का? देशसेवेसाठी कुणीच काम करत नाही, असे कुणी ठरवले आहे का ? मला माझा पगार पुरेसा आहे, असे होऊ शकत नाही का? ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे वानखेडे म्हणाले.

- पुढे कुणाला अटक होऊ शकते का?
सध्या आर्यन खानचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्याविषयी बोलणे योग्य ठरणार नाही. तपास पुढे कुठे जाईल, हे आता या क्षणी मी काय, कुणीही सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- काही राजकारण्यांकडून सध्या एनसीबीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह का उपस्थित हाेत आहे?
वानखेडे : ज्या राजकारण्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, ते खूप वरिष्ठ आहेत. मी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा झोनल डायरेक्टर (विभागीय संचालक) आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई करतो. जे माझे काम आहे तेच करतोय. माझ्याकडे सर्वसामान्य लाेक तक्रारी घेऊन येतात. त्यांच्यासाठी व देशासाठी काम करण्याचाच पगार मिळतो. जनतेचा सेवक असल्याने मी माझी जबाबदारी झटकू शकत नाही.

- नवाब मलिकांनी तुम्हाला तुरुंगात पाठवण्याचे वक्तव्य केले आहे...
वानखेडे : ते खूप मोठे आहेत. मी सामान्य सरकारी नोकर. मला भारताच्या राष्ट्रपतींनी वर्दी दिली आहे. कुणीही काहीही म्हटल्याने ती जाऊ शकत नाही आणि मुळात जर मी देशसेवा करतोय आणि ड्रग्ज क्लीन करतोय म्हणून माझी वर्दी काढणार का? माझा राजकारणाशी काय संबंध? मी माझे काम करतो. मला जो टास्क दिला आहे, ताे पूर्ण करतो. वर्दी उतरवण्यासाठी माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. बघूयात ते काय करतात.

- कारवाई सरकारी असतानाही हे वैयक्तिक स्वरूपाचे आरोप तुमच्यावर का केले जातात?
वानखेडे : मी त्याचे तीव्र खंडन करतो. तुम्ही आमच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ शकता, आमच्या चुका दाखवून देऊ शकता. पण माझ्यावर आणि कुटुंबीयांवर वैयक्तिक आरोप केले जातात, हे कितपत संयुक्तिक आहे? त्यापुढे हे काय करणार आहेत हे देखील मला माहिती आहे. असा प्रकार मी माझ्या कारकीर्दीत पहिल्यांदाच पाहताेय. तुमच्या एका नातेवाईकाविरोधात मी कारवाई केली होती, त्याची खुन्नस काढण्यासाठी तुम्ही असे व्यक्तिगत, कुटुंबीयांवर आरोप कराल, हे नाही चालणार.

- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे असे म्हटले आहे...
वानखेडे: मुख्यमंत्रीपद हे संवैधानिक आहे. त्यांच्या वक्तव्यांंवर मी काही बोलणे उचीत ठरणार नाही. पण त्याचवेळी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खूप आदर करतो.

- आर्यन खानच्या अटकेनंतर तुमच्यावर राजकीय दबाव निर्माण केला जातोय का ?
वानखेडे: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही एक अत्यंत प्रोफेशनल एजन्सी आहे. जात, पात, धर्म आणि व्यक्ती पाहून आम्ही काम करत नाही. जी काही माहिती मिळते त्यानुसार आम्ही काम करतो. न्यायालयासमोर देखील त्याच पद्धतीने केसेस आणि पुरावे सादर करतो. न्यायालयाने आर्यन खानचा दोनदा जामीन नाकारला आहे. असेच इतरांच्याही बाबतीत होते. त्यातून माझ्या परिवारावर आरोप करणे हे चुकीचे आहे. पण या दबावतंत्रामुळे मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.

- तुमच्यावर टीका करणाऱ्यांना काय उत्तर द्याल ?
वानखेडे : मी एवढेच सांगेन की माझ्या त्यांनादेखील शुभेच्छा आहेत. त्यांना जे बोलायचे ते बोलणार, मी माझ्या कामातून मला सिद्ध करतोय आणि करत राहणार.

- तुम्ही भाजपच्या इशाऱ्यावर काम करता असा देखील आरोप होत आहे...
वानखेडे : मी कुणाच्याही इशाऱ्यावर काम करत नाही. मी कायद्याप्रमाणे काम करतो. जे संविधान सांगते ते मी करणार.

- बॉलिवूडला टार्गेट करून महाराष्ट्राबाहेर नेण्याचा हा कट असल्याचा आरोप देखील एनसीबीवर केला जातोय...
वानखेडे: असे अजिबात नाही. आम्ही केलेल्या कारावाईंची एकूण संख्या पाहिली तर बॉलिवूडच्या फक्त दोघा अथवा तिघांविरोधात आम्ही कारवाई केली आहे. पण त्यानंतर लगेचच आम्ही बॉलिवूडला टार्गेट करतो, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.

- सर्वसाधारणपणे तुम्ही इतर कारवाया आणि बॉलिवूडशी संबंधितांवर कारवाई याबाबत काय सांगाल ?
वानखेडे : बॉलिवूडच्या कारवाईनंतर माझ्यावर आरोप होण्यास सुरूवात झाली. पण त्याआधी नायजेरियन पॅडलर, मुरलेले ड्रग्ज माफिया, दाऊदच्या भावावर कारवाई केली त्याबद्दल मला कुणी विचारले नाही. कुणी त्यासाठी शाबासकीची थापदेखील दिली नाही. दाऊदचे जम्मूमधील एक नेटवर्क काही महिन्यांपूर्वी उध्वस्त केले. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा चरसचे नेटवर्क चालवत होता. त्यावेळी आम्ही ३० किलो चरस पकडले होते. त्याच्या भावाची कस्टडी आम्ही याप्रकरणात घेतली होती. तेव्हा कोणी मंत्री कौतुक करण्यासाठी नाही आले.

- आता टीका करणारे त्यावेळी कुठे गेले होते? की त्यांना फक्त क्रूझवर केलेलीच कारवाई दिसते?
एक नेटवर्क काही महिन्यांपूर्वी उध्वस्त केले. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा चरसचे नेटवर्क चालवत होता. त्यावेळी आम्ही ३० किलो चरस पकडले होते. त्याच्या भावाची कस्टडी आम्ही याप्रकरणात घेतली होती. तेव्हा कोणी मंत्री कौतुक करण्यासाठी नाही आले. आता टीका करणारे त्यावेळी कुठे गेले होते? की त्यांना फक्त क्रूझवर केलेलीच कारवाई दिसते?

समीर वानखेडे एनसीबीते विभागीय संचालक झाल्यापासून झालेल्या कारवाया…
- गेल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात १०६ कारवाया.
- २२७ जणांना अटक
- ३७ परदेशी लोकांचा समावेश

जप्त केलेले ड्रग्ज..
- १०० किलो कोडीन
- ४० किलोपेक्षा अधिक चरस
- ८ किलोपेक्षा जास्त हेरोईन
- १५ किलो मेफोड्रोन यासह सगळ्या प्रकारचे ड्रग्ज एनसीबीने पकडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...