आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरालगत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाचे लाेखंड, महागडे साहित्य चाेरून ते विकणाऱ्या एका भंगार व्यावसायिकांच्या टोळीलाच पोलिसांनी रंगेहाथ पकडले. सलाउद्दीन शहा शाहीद शहा, शेख अरबाज शेख नूर (दोघेही रा. अंबर हिल) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सोमवारी मध्यरात्रीतून चोरलेला ३ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
समृद्धी महामार्गाचे काम मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. चिलंग्गी रामाणजुला रेड्डी हे व्यवस्थापक आहेत. मागील अनेक दिवसांपासून लोखंडी साहित्य चोरीला जात होते. परंतु कमी प्रमाणात साहित्य चोरीला जात असल्याने कंपनीच्या लक्षात आले नाही. ३ जानेवारी रोजी जोगवाडा हद्दीतील बांधकामाच्या ठिकाणी चिलंग्गी हे कर्मचाऱ्यांसह पाहणी करत असताना काही साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. यात ८० हजारांचे चॅनल, एक लाखांचे लोखंडी पॅनल, प्लास्टिक ड्रमचे अर्धवट तुकडे, शटरिंग ऑइल असा लाखोंचा ऐवज कमी दिसला.
त्यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याचदरम्यान गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना एका खबऱ्याकडून हा प्रकार अंबर हिल येथील भंगार विक्रेता करत असल्याची माहिती दिली. शेळके यांनी पथकासह सकाळी त्यांचा पाठलाग केला असता अरबाज व सलाउद्दीन नारेगावात हे साहित्य विकताना रंगेहाथ सापडले. आरोपींनी सात ते आठ वेळा चोरी केल्याची कबुली दिली.
पहाटे रिक्षा नेऊन चोरी
अनेक महिन्यांपासून साहित्याची चोरी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात कंपनीच्या स्टोअर कीपरचा यात सहभाग असल्याचे समोर आले होते. पहाटे तीन वाजता ही टोळी रिक्षा घेऊन जायची. ठरावीक ठिकाणी जाऊन ३०० किलोचे चॅनल, ३० ते ४० किलोचे पॅनल चोरून आणून ते नारेगाव, जिन्सीत विकत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.