आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने शुक्रवारी पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता १४ झाली आहे. या उद्यानात एकाच वेळी पाच बछडे जन्मण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
थंडीपासून बचावासाठी हीटर, सीसीटीव्हीद्वारे वाॅच
या प्राणिसंग्रहालयात याआधी मराठवाड्यातील सर्वाधिक नऊ वाघ होते. शुक्रवारी सिद्धार्थ-समृद्धी यांच्यापासून पाच बछड्यांचा जन्म झाला. पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हीटर लावण्यात आले असून, सीसीटीव्ही मार्फत वॉच ठेवला जात आहे. देखभालीसाठी २४ तास केअर टेकर नियुक्त करण्यात आला आहे. पिंजऱ्यात त्याच्याशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
समृद्धी एक डझन बछड्यांची आई
समृद्धी वाघिणीने आतापर्यंत १२ बछड्यांना जन्म दिला आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबर २०१६ ला तिने एक नर, दोन मादी अशा तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ ला एक नर, तीन मादी अशा चार बछड्यांना जन्म दिला होता. आता पुन्हा पाच बछडे तिच्या कुशीत खेळू लागली आहेत.
दोन वाघ मुंबईला
समृद्धीने यापूर्वी जन्म दिलेल्या १२ वाघांपैकी दोन केंद्रीय झू संचालनालयाच्या मंजुरीनंतर मुंबईतील प्राणिसंग्रहालयात आठ महिन्यांपूर्वी हलवण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.