आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा. तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी.'' असे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरीभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) मनीष कलवानिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.आर. देशमुख आदी उपस्थित होते.
बोगस बियाणांबाबत दक्ष राहा
भूमरे म्हणाले, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीने शासनास अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कर्ज पुरवठा तातडीने करा
खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुण करा तसेच शेतीपंपासाठी आवश्यक त्या प्रमाणात वीजपुरवठा होईल यादृष्टीने विद्युत विभागाने नियोजन करा. पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री भूमरे यांनी सांगितले.
मान्सूनपुर्व तयारी व पाणीटंचाई बाबतही आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारीबाबतही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या एकुण 62 गावांमध्ये मान्सुन पूर्व प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम राबविला असून जवळपास 2 हजार 687 गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या महिन्याच्या अखेरीस 165 आपत्ती प्रवण गावांमध्ये साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मान्सूनपुर्व तयारीबाबतही सादरीकरणाव्दारे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिली. तसेच पाणीटंचाई व जलजीवन मिशन या योजनांचाही आढावा घेण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.