आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा तर होणारच:लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार; संजय शिरसाट यांचे भाकित

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाकित शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिरसाट यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. खरेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुन्हा चर्चा सुरू

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेते बंड केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळले. तिथून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची देशभर चर्चा झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचे काय होईल ते होईल. मात्र, आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने काँग्रेसचे मातब्बर नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

काय म्हणाले शिरसाट?

संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांचे तसेही काही जमत नाही. बाळासाहेब थोरातांशीही अशोक चव्हाणांचे तसे काही जमत नाही. हे मीडियाने सगळे दाखवले आहे. आता मला तरी असे वाटते, अनेक दिवसाच्या ज्या काही घडामोडी चालल्या आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी नक्की भाजपमध्ये जातील. अशोक चव्हाण हे खूप मोठे नेते आहे. मात्र, या नेत्याला तिथे सुद्धा वागणूक बरोबर मिळत नाही, असे एकंदरीत दिसते आहे. म्हणून ते निश्चितच भाजपमध्ये जातील.

थोरातांचे गणित उलटे-पालटे

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण त्यांचे विखे-पाटलांसोबत विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. विखे-पाटील जर काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जातील. एकंदरीत त्यांचे उलटे-पालटे गणित असल्यामुळे त्यांच्याबद्दल साशंकता आहे, पण अशोक चव्हाणांची मानसिकता झाली असावी, असे मला वाटते. ते निश्चित भाजपमध्ये प्रवेश करतील, असे भाकित त्यांनी वर्तवले. सुषमा अंधारेंची वक्तव्ये प्रसिद्धीसाठी सुरू आहेत. तुम्ही कोर्टात जात किंवा कुठेही जा. तपास करा. मी काहीही चुकीचे बोललो नाही. आक्षेपार्ह बोललो नाही, असा दावा त्यांनी केला.