आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट व माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली आहे. तसेच, या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील लिहिणार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
उपोषणाच्या नावाखाली संपूर्ण शहर वेठीस
छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण पेटलेले असतानाच शिवसेनेने त्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोक उपोषणाच्या नावाखाली संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे.
तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का?
आमदार संजय शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरोधात लढा दिला. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर होणे आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. काही जणांना याचे वाईट का वाटत आहे? तुम्ही काय औरंगजेबाचे वंशज आहात का?, असा खोचक सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
कबरीचे अवशेषही नको
संजय शिरसाट म्हणाले, आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे अवशेषही नको. त्यामुळे खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत.
जशास तसे उत्तर देऊ
माजी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले की, एमआयएमचे नेते मर्यादा सोडून बोलत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अधिकृत नाव झाल्याने काही जणांना पोटदुखी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले. या आंदोलनात औरंगजेबाची पोस्टर झळकावले जात आहे. त्यामुळे भविष्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. असे काही झाल्यास आम्ही बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेना स्टाईल जशास तसे उत्तर देऊ.
संबंधित वृत्त
शहराचे नामांतर म्हणजे डिक्टेटरशिप:भावनिक मुद्द्यावर 30 वर्षे राजकारण केले, आता कोणता मुद्दा घेणार; माझ्यासाठी औरंगाबादच - इम्तियाज जलील
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे स्वरुप, त्यामागचे नेमके कारण काय? या आंदोलनाचा खरेच उपयोग होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जाणून घेतली. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.