आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाबरीच्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथे नव्हते, हे सत्यच आहे. मात्र, हे आंदोलन कुणा एकापक्षाचे नव्हते हे लक्षात घ्यायला हवे, प्रत्येक हिंदू धर्मीयांचा यात सहभाग होता, यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग किती होता, यावर भाष्य करण्याची गरज नाही, अशी सावध भूमिका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी घेतली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुण थोडी सावध भूमिका घेतली आहे. तिथे जे घडले ते पक्ष म्हणून नाही तर प्रभु श्री रामाचे भक्त म्हणून एकत्र आले होते. त्यामुळे यात बाळासाहेब ठाकरेंच्या सहभागाबद्दल बोलणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
शिंदे गट हा भाजपचा गुलाम - राऊत
संजय राऊत म्हणाले, हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली, असे शिंदे गट सतत म्हणत असतो. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावण्याची हिंमत दाखवणार नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे गुलाम झाले आहेत. गुलाम आपल्या मालकाविरोधात कधीही बोलत नाहीत.
बाळासाहेबांच्या त्यागावर भाजप उभा
संजय राऊत म्हणाले, बाबरी तोडल्यानंतर भाजपने या घटनेसाठी आपण जबाबदार नसल्याचे म्हटले होते. बाबरी तोडल्यानंतर भाजपने पलायन केले, हा इतिहास आहे. मात्र, आम्ही पळकुटे नव्हते. बाळासाहेब ठाकरे तसेच लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वासाठी जो त्याग केला, त्या त्यागावरच आज भाजप उभा आहे. तोच भाजप आज बाळासाहेबांवर चिखल उडवत आहे आणि त्याच चिखलात मिंधे सरकार बसले आहे. शिंदे गटाला आता हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. आम्ही सत्तेचे, भाजपचे गुलाम झालो आहोत, असे शिंदेंनी जाहीर करून टाकावे.
चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य काय?
बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कारसेवकांनी पाडली
चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.