आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍यायालयीन कोठडीत रवानगी:संत एकनाथ साखर कारखाना फसवणूक प्रकरण; जिल्हा न्यायालयाकडून तिघांचा जामीन फेटाळला

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद गटातील ऊसाच्‍या बॉस इआरपी या अ‍ॅपवर खोट्या नोंदी घेवून संत एकनाथ सहकारी साखर कारखान्‍याला 20 लाखांहून अधिकचा गंडा घातल्याप्रकरणी तिघा आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एम. कोचे यांनी फेटाळला. कावेरी विजय दसपुते (रा. सायगाव ता. पैठण), गणेश अशोक उभेदळ (३२, रा. सिडको वाळुज ह.मु. चांगतपुरी ता. पैठण) आणि रामदास ज्ञानदेव घोडके (३२, रा. पाटेगाव ता. पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.

नेमके प्रकरण काय?

प्रकरणात सचिन घायाळ प्रा. लि. संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालक सचिन घायाळ यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, कारखान्यामधील ऊसाच्‍या नोंदी घेण्‍यासाठी‍ वेगवेगळ्या गटामध्‍ये स्लिपबॉय नेमलेले आहेत. पाटेगाव या गटात धोंडीराम तट्टू याची स्लिप बॉय म्हणून नेमणूक करण्‍यात आली होती. त्‍यावेळी तट्टू याने स्‍वत: च्‍या दोन बैलगाड्या, ट्रक्टर ऊसतोडणी वाहतुकीसाठी कारखान्‍या बरोबर करार केला होता. स्लिप बॉय म्हणून काम करित असताना तट्टू याने बॉस इआरपी या अ‍ॅपवर खोटी माहिती भरुन कोणत्‍याही ऊसाच्‍या बॅलगाडीचे अथवा ट्रक्टरचे वजन न करता शेतकर्यांचे नावे बनवाट बिल तयार केले. बॉस इआरपी या अ‍ॅपवर ऊस गाळपाची माहिती तपासात होते, त्‍यावेळी वजन काट्यावर बैलगाडी न जाताच कावेरी दसपुते यांच्‍या नावे बिल तयार करण्‍यात आल्याचे निर्दशनास आले.

20 लाखांची फसवणूक

शंका आल्याने फिर्यादीने बीलावर दिलेल्या तारीख व वेळेनुसार सीसीटीव्‍ही तपासले असता प्रत्‍यक्षात कोणतीच ऊसाची बैलागाडी नसताना कारखान्‍याला ऊस मिळाला व तो ऊस गाळपासाठी गेल्याचे दाखविण्‍यात आल्याचे समोर आले. तट्टू यांच्‍याशी संगणमत करुन गणेश उभेदळ, ऊस काटा ऑपरेटर विजय दसपुते आणि रामदास घोडके यांनी कारखान्याची सुमारे 20 लाखांहून अधिक फसवणूक केल्याचे समोर आले. प्रकरणात एमाआयडीसी वाळूज पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तिघा आरोपींना 24 मे रोजी अटक करण्‍यात आली. न्‍यायालयाने आरोपींची पोलिस कोठडीनंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्‍यानंतर आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. प्रकरणात सहायल सरकारी लोकाभियोक्ता बी.एन. आढावे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...