आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवालदिल:प्रोग्रेस रिपोर्ट सादर न केल्यामुळे ‘सारथी’ने राेखले विद्यावेतन, प्रश्न तातडीने साेडवण्यासाठी शरद पवारांना साकडे

संतोष देशमुख | औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेलोशिपच्या विद्यार्थ्यांच्या संशाेधनाचा 6 महिन्यांत रिपोर्ट देणे अनिवार्य

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांत काय संशोधन केले, याबाबत त्यांनी सारथीकडे प्रोग्रेस रिपोर्ट सादर करायला हवा होता. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांना हा रिपोर्ट सादर करता आले नाही. यावरच सारथीने बोट ठेऊन विद्यावेतन राेखल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना सात ते दहा महिने होऊनही विद्यावेतन मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

मराठा समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी सारथी संस्थेमार्फत छत्रपती शाहू महाराज संशोधन शिष्यवृत्ती योजना व तारादूत योजना लागू करण्यात आली होती. मात्र, नियोजन शून्य कारभारामुळे तारादूत योजना लगेच बंद पडली. तर सारथी आणि मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. एमफील व पीएचडी धारक ९४ संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या दहा महिन्यांपासून तर उर्वरित ४०९ विद्यार्थ्यांना सात महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. खोलीभाडे, जेवण, शैक्षणिक खर्च कसा पूर्ण करावा, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे त्यांचे मानसिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नुकसान व अवमान होत असल्याने सरकारविरोधात रोष वाढत आहे. याबाबत दैनिक दिव्य मराठीने २६ मे रोजी सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. या वेळी सारथीचे संचालक अशोक काकडे यांनी आढावा घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. महिना उलटला तरी हा विषय प्रलंबित असल्याने काकडे यांच्याशी पुन्हा संवाद साधला असता त्यांनी ९४ विद्यार्थ्यांचे वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. आमच्या अडचणी समजून घ्या : फेलोशिप कुठलीही असो सहा महिन्याला प्रोग्रेस रिपोर्ट सादर अनिवार्य आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे ते आजही कायम आहे. विद्यापीठ बंद होते ते आता सुरु झाले आहे. विद्यार्थी गावी गेले आहेत. जिल्हाबंदी असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे ते अजून गावाहून परत आलेले नाहीत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी वसतीगृह कोविड संशयित रुग्णांना अलगीकरणासाठी आरक्षित केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठे राहायचे? शिवाय मार्गदर्शक व विभाग प्रमुख एकाच वेळी हजर राहातील का, असे एक नव्हे अनेक समस्या आहेत. यामुळे प्रोग्रेस रिपोर्ट भरलेला नाही.

प्रश्न तातडीने साेडवण्यासाठी शरद पवारांना साकडे

नागपूर अधिवेशनात विद्यार्थ्यांनी लक्षवेधी मागणी करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर मार्च मध्ये झालेल्या अधिवेशनात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात जुलै उजाडला तरी अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत आमदार चव्हाण यांनी खंत व्यक्त करून पक्ष प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची ३ जुलै रोजी मुंबई येथे भेट घेऊन माहिती देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाडी साकडे घातले.

बातम्या आणखी आहेत...