आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश चव्हाणांच्या प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे उत्तर:गल्ले बोरगावातील अद्रक संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगावातील अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत लेखी उत्तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले आहे.

गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात होत असलेल्या विलंबासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.20) विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. शेतकर्‍यांना सुधारित वाण व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने तसेच अद्रक पिकाच्या उत्पादनात बदलत्या हवामानानुसार मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात अद्रक/मसाले पीक संशोधन केंद्राची आवश्यकता असल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळविण्यासाठी सादर केलेला परिपूर्ण प्रस्ताव कृषी परिषदेने 22 सप्टेंबर 2022 रोजी मान्य करून शासनाकडे सादर केला मात्र यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाव्दारे उपस्थित केले. तसेच सतीश चव्हाण यांनी सप्टेंबर 2022 मध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती.

सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत तालुका बीजगुणन केंद्र, गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापनेबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी ठराव क्र.08/108/2022 दिनांक 22/09/2022 अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करून शासनाकडे शिफारशीत केला आहे. त्यानुषंगाने गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.

त्यामुळे गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला. गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करावे, यासाठी आमदार सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...