आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. सतीश चव्हाणांची अतुल सावेंकडे मागणी:संशोधक विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी महाज्योतीच्या विभागीय कार्यालयात करा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती पीएचडी 2022 करता 1 मे 2022 ते 30 जून 2022 या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्र/कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मराठवाड्यातील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी औरंगाबाद येथील महाज्योतीच्या विभागीय कार्यालयात करावी. अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

1 ते 15 सप्टेंबरदरम्यान नागपूर येथील महाज्योती कार्यालयात अर्जदार विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. मात्र दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) या घटकातील विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन छात्रवृत्ती ही योजना सन 2020-21 मध्ये कार्यान्वित केली.

संशोधक विद्यार्थ्यांना ई-मेलव्दारे सूचना

यंदासाठी 1 मे ते 30 जून या कालावधीत अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्र/कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान नागपूर येथील महाज्योती कार्यालयात अर्जदार विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. महाज्योतीकडून संशोधक विद्यार्थ्यांना ई-मेलव्दारे या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना नागपूरवारी का?

27 सप्टेंबर रोजी तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्रींच्या हस्ते महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले. या कार्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही असे वाटत होते. मात्र तरी देखील संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरवारी का? असा प्रश्न चव्हाण यांनी केला आहे.

5 ते 6 हजारांचा आर्थिक भुर्दंड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 6 सप्टेंबरपर्यंत प्री पीएचडी कोर्स वर्क सुरू असून त्याला उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे उर्वरित सात दिवसांत संशोधक विद्यार्थ्यांना नागपूरला धाव घ्यावी लागणार आहे. औरंगाबाद ते नागपूर अंतर जवळपास 500 कि.मी असून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्व खर्चाने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवास, निवास व्यवस्था, भोजन आदींचा विचार केला तर एका विद्यार्थ्याला जवळपास 5 ते 6 हजारांचा आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...