आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोराेना:औरंगाबादेत शनिवार-रविवार पूर्णत: लाॅकडाऊन; पुण्यातही निर्बंध कडक, गेल्या 20 दिवसांत महाराष्ट्रात रुग्ण दुप्पट

औरंगाबाद/नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परभणीत रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी; अकोला बुलडाण्यात मात्र दिलासा

महाराष्ट्रात शुक्रवारी १५,८१७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ते देशातील एकूण रुग्णांच्या ६१.४८% आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी ६१७ नवे रुग्ण, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीत ९५% वर गेलेला रिकव्हरी रेट आता ८८% पर्यंत घसरला आहे. शहरातील सर्व प्रमुख रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शनिवार व रविवारी १०० टक्के लाॅकडाऊन असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा, रुग्णालये, मेडिकल, किराणा दुकाने, एसटी बसेसची सेवा वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद राहतील.

दरम्यान, पुण्यात निर्बंध आणखी कडक केले आहेत. परभणीत रात्री १२ पासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. अकोला जिल्ह्यात शनिवार-रविवारचे लॉकडाऊन रद्द करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत निर्बंध असतील. बुलडाण्यात पूर्वीचीच संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

दर १०० चाचण्यांमध्ये ३ रुग्ण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही होत आहे
- केरळमध्ये २० दिवसांत नवे रुग्ण मिळण्याची संख्या अर्धी झाली आहे. रुग्ण ४२०० वरून २२०० पर्यंत घटले.
- राज्यात दर १०० चाचण्यांत ३.४२ रुग्ण आढळत आहेत. डब्ल्यूएचओनुसार ते ५ पर्यंत राहिले तर महामारी नियंत्रणात राहते.
- सक्रिय रुग्ण घटताहेत. २० दिवसांपूर्वी ५५,३०९ होते, आता ३३,७८१ आहेत.
- केरळने चाचण्या सतत वाढवल्या. ६० हजारांवरून ७० हजार चाचण्या नेल्या.

महाराष्ट्र : नवा स्ट्रेन नाही, फक्त लोकांच्या बेपर्वाईमुळे संसर्ग
- गेल्या २० दिवसांत नवे रुग्ण दुपटीपेक्षा जास्त. ५००० वरून आकडा ११ हजारांवर.
- महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या कमी असून ट्रेसिंगमध्ये पूर्वीप्रमाणे कडक भूमिका दिसत नाही, असा अहवाल राज्यात गेलेल्या केंद्रीय पथकाने दिला.
- राज्यात दर १०० चाचण्यांत १३ पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. हा आकडा ५ असावा. चाचण्या तिप्पट व्हाव्यात. {आयसीएमआरने सांगितले की, महाराष्ट्रात रुग्णवाढीचे कारण नवा स्ट्रेन नाही तर लोकांची बेपर्वाई हे आहे.

सरकारचे उद्दिष्ट-जुलैपर्यंत ३० कोटी डोस देणे, ते साध्य करण्यासाठी आता रोज १९.५ लाख डोस द्यावे लागतील
देशात १६ जानेवारीपासून ११ मार्चपर्यंत ५५ दिवसांत २.६१ लाख डोस देण्यात आले. म्हणजे रोज सरासरी फक्त ४.७४ लाख डोस. केंद्र सरकारने ३१ जुलैपर्यंत ३० कोटी डोसचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी पुढील १४२ दिवसांत रोज १९.५ लाख डोस देणे आवश्यक आहे. वेग वाढवला नाही तर ३१ जुलैपर्यंत सव्वा आठ कोटी डोसच दिले जातील. आरोग्य मंत्रालयानुसार, गरज भासल्यास रोज ५० लाख डोस दिले जाऊ शकतात. त्यासाठी ५० हजारांवर लसीकरण केंद्रे असतील.

सांभाळले नाही तर आणखी शहरांत लॉकडाऊन : नीती आयोग
नीती आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. व्ही. के. पॉल यांच्या मते, आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, पंजाबमध्ये आढळत होते. पण आता इतर राज्यांचाही समावेश झाला आहे. दिल्लीत शुक्रवारी ४३१ रुग्ण आढळले. हा २ महिन्यांतील सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे नाेएडा, गुरगाव, फरिदाबाद, गाझियाबादमध्येही धोका वाढला आहे.

अमेरिकेत प्रौढांना डोस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, १ मेपासून प्रौढांनाही लस दिली जाईल. ४ जुलैला स्वातंत्र्य दिनापासून सभांनाही परवानगी दिली जाईल.

टी-२० त ५०% प्रेक्षकांना प्रवेश
गुजरातमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टी-२० मालिकेच्या सामन्यांत ५०% प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाईल.

मोठा प्रश्न.. सर्व मोठ्या देशांचे आठवड्यात सात दिवस लसीकरण, भारतात रविवारी का नाही?
अमेरिका-ब्रिटनसह सर्व प्रमुख देशांत रविवारीही सामान्य कामकाजाच्या दिवसाएवढेच डोस दिले जातात. मात्र, भारतात तसे होत नाही. केंद्र सरकारचा डेटा असे दाखवतो की, गेल्या चार रविवारी देशात लसीकरणात आश्चर्यकारक घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मार्चमध्ये जेव्हा संपूर्ण जगाने कोरोनाशी लढाई सुरू केली होती, तेव्हा एकट्या भारतातच रविवारीही नियमितपणे चाचण्या होत होत्या, तर युरोपमधील देशांत वीकेंडला चाचण्या ८०% पर्यंत घटत होत्या. पण आता हा ट्रेंड भारतात लसीकरणाबाबत दिसत आहे. दुसरीकडे, युरोपमधील देशांत मात्र दररोज लसीकरण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...