आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या हाती लागेना:सविताला धमकावणारा गायके सापडेना; 4 दिवसांपासून गैरहजर

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर पेटवून घेतलेल्या सविता दीपक काळे (३४) हिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांमध्ये सतत धमकावणारा सहायक फौजदार नारायण दशरथ गायके फरार झाला आहे. सविताने पेटवून घेताच आपण अडकणार असल्याचा संशय आल्याने तो १ सप्टेंबर रोजीच फरार झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो क्रांती चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. विशेष म्हणजे तो घरीदेखील मिळून आला नसल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मोठमाेठ्या गुन्हेगारांना शोधणाऱ्या पोलिसांना त्यांचाच एक सहकारी असलेला पोलिस मिळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सविताच्या मृत्यूनंतर रात्री उशिरा त्यांचे भाऊ श्यामसुंदर काकडे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पती दीपक काळे, शेजारी संगीता शेळके, तिचा पती अशोक व मुलगा गोकुळ यांना गुन्हा दाखल होताच अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत त्यांच्याकडून काय समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चौघांना अटक करण्यात पोलिसांनी तत्परता दाखवली. मात्र, सविताने पेटवून घेताच आपण अडकणार, याची जाणीव झालेला सहायक फौजदार गायके अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गायकेची सविताचा पती दीपक प्रमाणेच शेळके कुटुंबाशी जवळीकता असल्याचे सविताच्या नातेवाइकांनी सांगितले होते.

यातील चारही आरोपींना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी दिले. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सहायक सराकरी वकील निता कीर्तिकर यांनी गुन्हा गंभीर असून गुन्ह्याचा सखोल तपास करणे बाकी असल्याने कोठडी देण्याची विनंती केली.

पहिले वाळूज, आता क्रांती चौक पोलिस ठाण्यात कार्यरत
पाच क्रमांकाचा आरोपी असलेला सहायक फौजदार गायके काही वर्षांपूर्वी वाळूज ठाण्यात कार्यरत होता. नंतर मुख्यालयात काही काळ राहिल्यानंतर नुकत्याच झालेल्या बदल्यांत त्याची क्रांती चौक पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. गायके सतत सविताला धमकावत होता. सविताचा पती दीपक व संगीता त्याच्या नावाने धमकावत असत. सविताने आत्महत्या करत असल्याचे दिलेल्या निवेदनात गायकेचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. शिवाय जेव्हा जेव्हा सविता ठाण्यात जायची तेव्हा गायके संगीताला सविताविरोधात तक्रार देण्यासाठी सांगत असे. ठाण्यात पोलिसांकडे कुठले कलम लावण्यासाठी आग्रह करायचा, हे सर्व गायके संगीताला सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु, बेगमपुरा पोलिसांनी तो अद्यापही का पकडला गेला नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...