आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावित्रीबाई फुले जयंती विशेष:खुरपणी करत जपानी, फ्रेंच शिकताहेत सावित्रीच्या लेकी, स्वयंपाक करतानाही जपानी

नागरजवळा (जि. परभणी) / नितीन पोटलाशेरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"क्योनेन वा फुसा नी सा रेमाशीता. शोगत्सु नी गाको नी इकामासू का.' ही ओळ वाचून कदाचित आपला गोंधळ उडण्याची शक्यता आहे. पण, ‘मागचं वर्ष लॉकडाऊनमध्ये सरलं. आता नव्या वर्षात तरी शाळेत जाता येईल का,’ असा प्रश्न मानवतजवळील नागरजवळाची श्रुती तिची वर्गमैत्रीण ज्ञानेश्वरीला गव्हाच्या शेतात खुरपणी करताना जपानी भाषेत विचारत आहे. असेच शब्द गावातील बऱ्याच घरांत कानी पडत आहेत. कारण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या १३ मुलींनी लॉकडाऊनच्या काळात जपानी, गुजराती, इंग्रजी, फ्रेंच अशा नानाविध भाषा शिकण्यास सुरुवात केली अन् ४० टक्क्यांपर्यंत ही भाषा आत्मसातही केली आहे.

मजूर नसल्याने आपल्या पालकांसोबत खुरपणीची कामे, घरकामात आईची मदत वा खेळ खेळतानाही प्रत्येक कृतीशी संबंधित इंटरनेट, सोशल मिडियाच्या माध्यमातून जाणून घेत या मुली परदेशी भाषांमध्ये पारंगत्व मिळवत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असताना शाळांना कुलूप लागले. पण नागरजवळा व इतर जि.प. शाळातील मुली मात्र गट करून अभ्यास करतच आहेत. १४ वर्षांची श्रुती होगे तिच्या वर्गमैत्रिणी ज्ञानेश्वरी होगे, भाग्यश्री देंडगे, अश्विनी, भक्ती, उषा, प्रतिक्षा, साक्षी, रोहिणी, ऋतुजा यांच्यासह अन्य चार ते पाच जणी सकाळी ९ वाजेपासून अभ्यास सुरू करतात. अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून हा नित्यक्रम सुरूच आहे. त्यांना सर्वाधिक मदत होते ती शिक्षक विकास जुकटे यांची. व्हॉट्सअपचे त्यांनी विविध ग्रुप केले आहेत. यात दररोज नवीन टास्क टाकला जातो. तो सोडवण्याचे आव्हान मुलींना दिले जाते.गेल्या दहा महिन्यात मुलींनी ‘वी लर्न इंग्लिश’चे ८४ भागांचा अभ्यास केला. स्पोकन इंग्लिश सुधारण्यासाठी याची खूप मदत झाली. पुढे त्यांना दुसऱ्या परदेशी भाषा यायला हव्यात यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने सर्व मुलींना गुजराती भाषेचे धडे गिरवले. अगदी अल्पाधित ती भाषा आत्मसात केल्यानंतर मोर्चा जपानी भाषेकडे वळवण्यात आला. दररोज एक टास्क त्यांना दिला जातो त्या पद्धतीने संबंधित व्हिडिओ बघून तो टास्क पूर्ण करून सरांना टाकतात. नंतर त्याचे मूल्यमापन होते.

स्वयंपाक करतानाही जपानी
जपानी किंवा इतर भाषेची गोडी लागावी म्हणून शिक्षकांकडूनच तशा प्रकारचा टास्क दिला जातो. अगदी स्वयंपाकघरात आईला मदत करतात. कुठल्या वस्तूला काय म्हणायचे, त्याचे महत्त्व काय किंवा शेतात कामाला गेल्यानंतर आपण काय काय गोष्टी करतो याचे संभाषण जपानीतून केले जाते. जेथे शब्द अडखळतात तेथे इंटरनेटवरील ट्रान्सलेटरची किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शिक्षकांची मदत घेतली जाते.

परिसरातही इतर भाषांचे धडे
नागरजवळा शाळेचा आदर्श घेऊन परभणी जिल्ह्यात मानवतच्या आजूबाजूला मानवत सीपीएस स्कूल, इटाळी, कोथाळा आदी ठिकाणीही मुली विविध भाषा शिकत आहेत. या उपक्रमासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. आर. रणमाळे, शिक्षक विकास जुकटे, राजेश चव्हाण, संजय पकवाने आदी प्रयत्न करत आहेत.

१३ मुली घेतात ४० जणांचा क्लास
जपानी शिकणाऱ्या १३ मुली त्यांच्या खालच्या वर्गातील व घराच्या शेजारील किंवा कुटुंबातील पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या ४० मुला-मुलींना जपानी भाषेची प्राथमिक माहिती देतात. त्यामुळे बरीच मुले आता १ ते ५० पर्यंतचे आकडे बोलून दाखवतात. काही जणांना जपानीतील बाराखडीही येते.

बातम्या आणखी आहेत...