आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकवले मोती, हाती कवड्या:फसवणुकीचे जाळे राज्यभर ; कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस काेर्टाने जामीन नाकारला

औरंगाबाद / संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादसह राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना मोती उत्पादनातून लाखो रुपये मिळवण्याचे आमिष दाखवून त्यांची काेट्यवधींची फसवणूक करणाऱ्या इंडोपर्ल कंपनीचा मालक अरुण नागोराव अंभोरे याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादेतील पाच शेतकऱ्यांनी त्याच्याविरोधात १ कोटी १० लाख फसवणुकीची फिर्याद दिली असली तरी प्रत्यक्षात त्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खोटे चेक देऊन कोट्यवधींना फसवल्याची माहिती आहे. जिल्हा न्यायालयाने आरोपीला तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला आहे. ३ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. पोलिस चौकशीत आणखी अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील काही भागात शेतकऱ्यांनी शेततळे घेऊन मत्स्यव्यवसाय, मोत्यांच्या शेतीचे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. अशा शेतकऱ्यांना हेरून इंडोपर्ल कंपनीकडून शिंपले (मोत्याचे बीज) देण्यात आले. तसेच तयार झालेले मोती बांधावरून खरेदीची हमीही अंभोरेने दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायात येण्याचे धाडस केले. अरुण अंभोरे यांनी या सर्व शेतकऱ्यांना कच्चा माल (मोत्याचे बीज) विकले. तसेच त्यांच्याकडे तयार झालेल्या मोत्यांची खरेदी करून त्याची परराज्यात विक्री केली. सुरुवातीला काही शेतकऱ्यांना मोबदला दिला.

त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. नंतर अंभोरे याने पोस्टडेटेड चेक दिले. बँकेत टाकताच ते बाउन्स झाले आहेत. त्यामुळे शेतकरी त्याच्याकडे पैशासाठी पाठपुरावा करत राहिले, मात्र तो फक्त आश्वासनेच देत गेला. लाडसावंगी सर्कलमधील काही शेतकऱ्यांचे लाखो रुपये यात अडकले आहेत. जिल्ह्यातील इतर भागासह राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे देणे अंभोरेने चुकवले नाही. औरंगाबादच्या ५ शेतकऱ्यांनी त्याच्याविरोधात करमाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. न्यायालयातही दाद मागितली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. तक्रारदार पाचच शेतकऱ्यांची १ कोटी १० लाखांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. राज्यभरात अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाली असेल, असे अॅड. के. एन. शेरमाळे व अॅड. यू. एस. मोटे यांनी सांगितले.

बँक खाते केले सील
शिंपले बीज, तयार झालेल्या मोत्यांचा साठा करण्यासाठी अंभोरेने जागा भाड्याने घेतली होती. त्याचे अनेक महिन्यांचे भाडेही त्याने दिले नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्यांनी सांगितले. कुंभेफळ येथील शेतकरी अनिल गोजे म्हणाले की, मोती उत्पादनासाठी त्याला शेततळे भाड्याने दिले होते. त्याचे साडेतीन लाख रुपये अंभोरेने दिले नाहीत. अंभोरेचे बँक अकाउंट पोलिसांनी सील केले आहे. खुद्द पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे चौकशीलाही आता वेग
आला आहे.

२०० जणांना गंडा
बँक कर्ज घेऊन, पदरची पुंजी लावून आम्ही अंभोरेकडून ५ लाख ६७ हजार रुपयांत ७ हजार शिंपल्यांचा कच्चा माल विकत घेतला, तर ११ लाख ३३ हजार रुपयांचे मोती त्याला विक्री केले. अनामत रक्कम म्हणून त्याने चेक दिला होता, पण तो वटला नाही. फोन केला तर नुसते पैसे देतो म्हणायचा. आता फोनही घेत नाही, अशी तक्रार तुषार अंकुशराव शेळके यांनी केली. लाडसावंगी परिसरात सुमारे २०० शेतकरी ही शेती करतात. त्यापैकी बहुतांश जण फसले आहेत. पण पोलिसात तक्रार दिली तर पैसे मिळणार नाहीत या भीतीपोटी ते पुढे येत नाहीत, असे ते म्हणाले.

माझे १७ लाख गेले
मी व्याजाने पैसे घेऊन अरुण अंभोरेकडून ११ लाख ३४ हजार रुपयांचा १४ हजारांचा कच्चा माल खरेदी करून त्यापासून मोती पिकवले. १७ लाख १३ हजार ३०४ रुपयांत त्याला मोती विक्री केले. त्याने चेक दिला पण तो वटला नाही. माझे पैसे अजून मिळाले नाहीत. विश्वासघात व फसवणूक झाल्याने मी हतबल झालो आहे.
- भगवान रघुनाथ पवार, तक्रारदार शेतकरी.

माझे २२ लाख अडकले
मी ११ लाख ९ हजार ७०० रुपये देऊन अरुणअंभोरे कडून १३७०० शिंपल्यांचा कच्चा माल विकत घेतला होता. शेततळ्यात ते शिंपले टाकून मोत्यांचे उत्पादन घेतले व अंभोरेलाच २२ लाख १८ हजार ४०० रुपयांत विक्री केले होते. त्याने चेक दिला पण तो वटला नाही. मी प्रचंड आर्थिक, मानसिक संकटात सापडलो आहे. रात्री झोप येत नाही. आम्हाला न्याय मिळावा.
-कृष्णा बाबुराव पोफळे, तक्रारदार शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...