आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित शालेय विभागीय हॉकी स्पर्धेत रेजिमेंटल हायस्कूलच्या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. रेजिमेंटलच्या 14 वर्षाखालील मुले व मुली आणि १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत औरंगाबाद, जालना, बीड व परभणीच्या संघांनी सहभाग नोंदवला होता.
संकुलात झालेल्या 17 वर्ष मुलींच्या अंतिम लढतीत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रेजिमेंटल हायस्कूलच्या संघाने जालना संघावर एकतर्फी लढतीत 7-0 गोलने विजय मिळवला. जालना संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाकडून कर्णधार भावना सिंगच्या सुरेख पासवर श्रृती भागडेने गोलची हॅटट्रिक साधली. सिमरन खुळेने एक गोल केला. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक संजय तोटावाड व प्रशिक्षक अकबर खान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाला शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सोनवणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जान्हवी, खुशी, भरत, चमकले :
मुलींच्या 14 वर्षाखालील गटात अंतिम लढतीत रेजिमेंटल हायस्कूलने जालन्याच्या लिटिल स्टार स्कूलच्या संघावर 4-1 गाेलने विजय मिळवत राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. संघाच्या विजयात जान्हवी बम, खुशी जावळे, पायल थोरात आणि संजना शर्मा यांनी प्रत्येकी एकेक गोल करत मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, मुलांच्या अंतिम लढतीत रेजिमेंटल संघाने जालना संघावर शानदार पेनल्टी गोल करत 1-0 ने विजय मिळवला. या सामन्यात भरत आरकेने पेनल्टीवर गोल करत संघाला विजय मिळवून दिला. ‘संघ शानदार फार्ममध्ये आहे. विजेतेपदासाठी आमचा प्रयत्न राहिल. राज्य स्पर्धेत आमचा रेजिमेंटल संघ पहिल्या तीनमध्ये राहिल, असा विश्वास क्रीडा शिक्षक संजय तोटावाड यांनी व्यक्त केला.’
पुणे, अकोला येथे होणाऱ्या राज्य स्पर्धा :
रेजिमेंटलच्या विजेत्या तिन्ही संघांनी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. 17 वर्षाखालील मुलींचा संघ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे 22 ते 24 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. त्याचबरोबर, 14 वर्षाखालील मुले व मुलींचा संघ अकोला येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.