आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्वरित शाळांना 2 दिवसात वाटप:2 महिन्यानंतर शालेय पोषण आहाराचे साहित्य वितरित; 70 टक्के शाळांना मिळाले दाळ-तांदुळ, तेल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ३१६५ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मध्यान्हसाठी उसनवारीची वेळ आली होती. आता हा प्रश्न सुटला आहे. सोमवारी जिल्ह्यातील ७० टक्के शाळांना शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले असून, उर्वरित ३० टक्के शाळांना येत्या दोन दिवसात पुरवठा केला जाणार आहे.

फेब्रुवारी- मार्च महिन्यात शालेय पोषण आहराचे साहित्य संपले. शाळांना सुट्या लागण्यासाठी महिनाभराचा अवधी बाकी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळांवर उसनवारी करण्याची वेळ गेल्या दीड - दोन महिन्यात आली होती.

पोषण आहारासाठी लागणारे डाळ, तांदुळ, तेल, तीखट मीट संपले होते. शासन स्तरावरुन या पोषण आहारासाठीच्या साहित्यासाठीच्या करार प्रक्रिया न झाल्याने आहाराचे वाटप शाळांमध्ये ठप्प झाले होते. यामुळे जवळच्या शाळा तसेच लोकसहभागतून मुलांना मध्यांन्ह भोजन देण्याची वेळ शाळांना करावी लागत होती.

शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोषण योग्य पद्धतीने व्हावे. त्यांनी शाळेत नियमित उपस्थित रहावे यासाठी शालेय पोषण आहार योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे . या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३१६५ शाळांमधील ४ लाख ६५ हजार ८६२ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पोषण आहार वाटपात अडचणी होत्या. शाळा सुरु झाल्यावर मात्र नियमित पोषण आहार सुरु झाला. त्यात पुन्हा स्वयंपाकी व मदतनीसांचे मानधन थकल्याने पोषण आहार बंद झाला होता.

तर गेल्या दोन महिन्यात शासन स्तरावर कराराची प्रक्रिया न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी उसनवारी करण्याची वेळ शाळांवर आली होती. आधीच स्वयंपाकाचा गॅस तेल महाग झाले आहे. अजून शाळांना सुट्या लागण्यासाठी महिन्यांचा कालावधी बाकी असतांना शाळांना डाळ, तांदुळ, तिखट, मीट, तेल संपल्याने लोकसहभाग आणि जवळच्या शाळांकडून मदत घ्यावी लागत होती. तर काही शाळांमध्ये थोडाफार पुरवठा बाकी होता. मात्र, दोन महिने हीच परिस्थिती कायम राहिल्याने शाळास्तरावर रोष निर्माण झाला होता.

अखेर सोमवारी दि. ३ एप्रिल रोजी शाळांना पोषण आहाचे साहित्य वितरण सुरु करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शालेय पोषण आहार पात्र विद्यार्थी संख्याा ४ लाख ६५ हजार ८६२ तर एकूण शाळांची संख्या ३१६५ यांना विद्यार्थी संख्येनुसार प्रती विद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी १०० ग्रॅम तांदुळ, २० ग्रॅम दाळ प्रमाण तर सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम प्रती विद्यार्थी तांदुळ, ३० ग्रॅम दाळ असे प्रमाण आहे. पटसंख्येनुसार या आहाराचे वाटप होते.

७० टक्के शाळांना वाटप

शासन स्तरावरुन कराराची प्रक्रिया थांबलेली होती. ती आता पूर्ण झाली असून, ७० टक्के शाळांना पोषण आहार ससाहित्याचे वाटप सुरु केले आहे. उर्वरित शाळांना दोन दिवसात वाटप पूर्ण होईल. - भाऊसाहेब देशपांडे, शालेय पोषण आहार प्रभारी अधिक्षक.