आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपत्रकाद्वारे दिले निर्देश:वाचनाची गोडी लागावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे सदस्य करणार

औरंगाबाद / विद्या गावंडेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागाच्या ४, २०० ग्रंथालयांत १३ लाख ७० हजार नोंदणीकृत वाचक आहेत. त्यात आता आणखी ५,२७,६६९ वाचकांची भर पडेल. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सदस्य करून घेण्याचे आदेश ३ जानेवारीला दिले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून शिक्षण विभागाने हा अनोखा प्रयोग हाती घेतला आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो. बहुतांश शाळांमध्ये १८ तास अभ्यास अभियानही राबवले जाते. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून विविध उपक्रम हाती घेतले जातात. तरीही सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. तर काही छोट्या शाळांमध्ये ग्रंथालयेच नाहीत, असेही निदर्शनास आले आहे. दुसरीकडे ग्रंथालयांना सरकार अनुदान देते. अशा ग्रंथालयात विद्यार्थ्यांनी जाऊन अवांतर वाचन वाढवावे, असे शिक्षण विभागाला अभिप्रेत आहे. म्हणून सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासकीय तथा अनुदानित ग्रंथालयांचे सदस्य करून घेणार आहे. यासंदर्भात ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक सुनील हुसे म्हणाले, ‘शाळांमध्ये ग्रंथालये नाहीत तर ग्रंथालयांत वाचकांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढण्यासाठी या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल.’

शिक्षकाला समन्वयक करणार उपसंचालक, शिक्षणाधिकारी, निरीक्षकांना पत्र गेले. शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाच्या सहायक संचालकांकडून कोणती शाळा कोणत्या ग्रंथालयास जोडली जाऊ शकते याचा यादी घेऊन अभ्यास करावा. त्यानंतर ग्रंथालये आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गणीदार करून घ्यावे. शिवाय शाळेतील एका शिक्षकाला उपक्रमाची जबाबदारी द्या.

ग्रंथालयांची माहिती घेणार विभागीय ग्रंथालयाकडून तालुकानिहाय ग्रंथालयांची माहिती घेण्यात येईल. त्यांचे शुल्क किती आहे. याची माहिती घेवू. जर ते अगदीच नॉमिनल असेल तर अनुदानित शाळांना स्वत: भरण्यास सांगण्यात येईल. -एम.के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...