आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना लागले सहलींचे वेध!:शैक्षणिक सहलीसाठी 25 शाळांचे प्रस्ताव, कोरोनानंतरच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळाच्या दोन वर्षांनंतर यंदा शाळा जूनपासून पूर्ववत सुरू झाल्या. दिवाळीनंतर आता शाळांना सहलींचे वेध लागले आहे. शालेय शिक्षण विभागानेही सहलींचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असून पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या मंजुरीसाठी पंचवीस प्रस्ताव आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना लॉकडाऊनमध्ये घरातूनच अभ्यास करणारे विद्यार्थी दोन वर्ष सहलीला मुकले होते. यंदा नविन शैक्षणिक वर्ष नियोजित वेळेत सुरू झाले. त्यामुळे शाळा जोमाने सहलीसाठीची तयारी करीत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहलीचे नियोजन केले आहे. याच महिन्यात शाळेत क्रीडा स्पर्धा, वार्षिक महोत्सवाचे आयोजनही करण्यात येत आहे. कोरोनाकाळात शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी यंदा पहिल्यांदाच सहलीला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

ऐतिहासिक ठिकाणी काढवी सहल

शाळांनी ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणीच सहल काढाव्यात, अशा शिक्षण विभागाच्या सूचना आहेत. तसेच सहलीसाठी शाळांनी एसटीलाच प्राधान्य द्यावे असा नियम आहे. मात्र, खासगी शाळांचा स्वतःच्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह आहे. सहलीसाठी स्कूल बसची परवानगी मिळणार नाही; म्हणून काही खासगी शाळांनी विनापरवानगीच सहली काढल्या आहेत. अशा सहलींची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी एम. के.देशमुख यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा विमा काढावा

सहलीला येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात यावा, अशी सूचना शिक्षण विभागाने शाळांना केली आहे. तसेच सहल निघण्यापूर्वी किमान 10 ते 15 दिवस आधी सहल परवानगी घेणे बंधनकारक आहे. सहलीत विद्यार्थिनी असल्यास महिला शिक्षकांची नेमणूक करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असेल. तसेच विद्यार्थ्यांवर सहलीला येण्यासाठी सक्ती करू नये, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सहल नेणाऱ्या शाळांसाठी सूचना

  • समुद्रकिनारे, नदी, गड, किल्ले अशा ठिकाणी सहली जात असताना विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
  • सहलीसाठी सरकारी बसलाच प्राधान्य द्यावे.
  • वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असावे.
  • शिक्षकांनी तंबाखू, गुटखा तसेच अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.
  • माध्यमिक विभागाची सहल राज्याबाहेर नेण्यास हरकत नाही.
  • सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आवश्यक
बातम्या आणखी आहेत...