आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात इयत्ता नववी ते अकरावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनावर सोपवला होता. राज्य सरकारच्या आदेशाची औरंगाबादेत अंमलबजावणी होणार असून ग्रामीण भागातील शाळा येत्या सोमवारपासूनच सुरू होणार आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी अडचणी येत आहेत. शिवाय सुविधांचा देखील अभाव आहे. इंटरनेटच्या अडचणींमुळे शिक्षणात समस्या कायम आहेत.तर मुलांच्या विकासासाठी एकमेव माध्यम शिक्षणच आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ८२४ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी निवासस्थानी चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदावले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी बी चव्हाण यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शहरी आणि ग्रामीण परिस्थिती व तेथील समस्या वेगळ्या आहेत. ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असुन रुग्ण बरे होण्याचा दर 96 टक्के आहेत. शहरापेक्षा मृत्यु दरही कमी आहे. शिक्षणासाठी शाळाच सर्वात उत्तम माध्यम मुलांसाठी असल्याने व ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांची कमतरता आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे राज्य शासनाच्या नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या अनुकूल निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 7130 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पुर्ण केली जात आहे. शनिवारी दुपार पर्यंत साडेचार हजार शिक्षकांची तपासणी झालेली असुन त्यातून 9 जण पॉझिटिव्ह आले आहे. हे प्रमाण चिंता करण्यासारखे नाही. सोमवार पर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होतील. शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणी शिवाय शाळेत जाता येणार नाही. तर पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत घेतल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. मात्र, त्याचे जीवन अमुल्य आहे. बाधितांच्या संख्येतील वृद्धी आणि कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता याची पडताळणी 10 डिसेंबरला करु. शाळा सोमवार पासून सुरु होतील. पण, विद्यार्थ्यांना 3 जानेवारीपर्यंत शाळेत न येण्याची मुभा दिल्याची माहिती मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली. ग्रामीण भागामध्ये तपासणी झालेल्या शिक्षकांची 100 टक्के शहरात 50 टक्के शिक्षकांची सोमवार पासून उपस्थिती असेल मात्र, तपासणी झालेल्या शिक्षकांची शक्यता लक्षात घेता सोमवारी 70 टक्केच शिक्षक उपस्थित राहू शकतील असे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण म्हणाले.
मात्र पालकांचे हमीपत्र आवश्यक
दरम्यान शाळेत उपस्थिती राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे हमीपत्र आवश्यक असणार आहे. विद्यार्थी शाळेत येण्यास तयार असले तरी देखील पालकांची मंजूरी महत्त्वपूर्ण असणार आहे.असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
त्यावेळेपूर्तेच प्रमाणपत्र
शिक्षकांना कोरोनाची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करुन शाळेत हजार राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र तपासणी नंतरही कोरोना होवू शकतो. अशावेळी तपासणीचे प्रमाणपत्र किती दिवस ग्राहय धरणा असे विचारले असता ते प्रमाणपत्र त्यावेळेपूर्ते असेल. त्यानंतरही जर एखाद्या शाळेत शिक्षक अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यास त्या त्या वेळी परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील काही बदलही केले जातील असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
तपासणीबाबत संभ्रम कायम
शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद तर ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. शिक्षकांना शाळेत येण्यापूर्वी कोरोना तपासणी आवश्यक सांगण्यात आली आहे. मात्र ज्या भागातील शाळा सुरु होणार नाहीत. त्यांना तपासणी अनिवार्य असणार नाही असे मनपा आयुक्त यांनी म्हटल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना
> शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण > स्वच्छतेच्या प्रक्रियेत मुलांना सहभागी करू नये > शाळेत हँडवॉश, सॅनिटायझर, साबण, पाण्याची व्यवस्था > विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी > बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश > सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एचआरसीटी तपासणी > शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.