आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात प्रथम शाळांना आरटीई नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ही मुदत शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर आता 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विशेषतः नियोजित मुदतीत 617 शाळांपैकी फक्त 281 शाळांनी नोंदणी करुन माहिती कळवली आहे. तर अद्यापही 336 शाळांची नोंदणी बाकी माहिती असल्याचे समोर आले आहे. यावर शाळांनी नोंदणी न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन मान्यता रद्द करण्यातही येवू शकते असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार वर्ष 2022-2023 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाइन सोडत काढून मराठवाड्यात 15 हजार 565 विद्यार्थ्यांची निवड यादी आरटीई पोर्टलवर जाहिर केली होती. या एकूण जागांपैकी सुमारे 40 टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. दरम्यान या वर्षी प्रक्रिया राबवून शंभर टक्के प्रवेश करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
मात्र हवा तसा प्रतिसाद अजूनही शाळांकडून मिळत नसल्याचे चित्र शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत शाळांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत औरंगाबाद मध्ये 617 शाळांपैकी 281 शाळांची नोंदणी झाली असून, त्यापैकी 336 शाळा बाकी आहेत. ज्यात मनपा हद्दीतील 150, युआरसी वन 93 तर युआरसी टु मधील ७२ शाळांची नोंदणी अद्याप बाकी आहे. या संदर्भात मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना देखील कळवण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाले की, आरटीई प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे असलेल्या आरटीई प्रवेशासाठीच्या पहिल्या वर्गातील जागा, वर्गाप्रमाणे क्षमता शिक्षण विभागाला कळवायची असून, आरटीई प्रमाणपत्र देखील घ्यायचे आहे. असे न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करत मान्यता रद्द करण्यात येईल. तसेच ज्या शाळा बंद, ज्यांना मायनॉरिटिचा दर्जा आहे. त्यांनी देखील माहिती घेत आहोत.
पालकांना वेळापत्रकाची प्रतिक्षा
दरम्यान शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु असल्याने आता पालकांना त्यांच्या पाल्यांसाठीची नोंदणी प्रक्रिया कधी सुरु होणार याची प्रतिक्षा आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीपर्यंत पालकांसाठीची नोंदणी सुरु झाली होती. त्यामुळे यंदा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.