आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळ:शालेय शिक्षकांना जिवाची भीती, क्लासचालकांना चिंता उदरनिर्वाहाची; खर्च भागवला जात नसल्याने काही क्लासेस चालकांनी बंद केला व्यवसाय

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्ञानदान सुरू असताना शिक्षकांनाच शाळेत येण्याची सक्ती का? शिक्षक संघटनांचा सवाल

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. परंतु शिक्षकेतर कर्मचारी व ५० टक्के शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. याला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरळीत असताना शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे ८ महिन्यांपासून खासगी क्लासेस बंद असल्याने इमारतीचे भाडे भरणे व शिक्षकांचे वेतन देणे बंद झाले. काहींचे तर ज्ञानदानाचे कार्य बंद झाले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ज्ञानदान सुरू असताना आग्रह का?

काही दिवसांपूर्वी पाथरीतील उर्दू शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विद्यार्थीच शाळेत नाहीत. ऑनलाइन शिकवणी सुरू असताना शिक्षकांनाच शाळेत येण्याची सक्ती का केली जात आहे? त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सरकार घेणार का? हा मूळ प्रश्न आहे. शिक्षकांच्याही मनात कोरोनाची भीती कायम आहे. -प्रा. सुनील मगरे, संस्थापक सचिव, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन.

शिक्षकांच्या पिळवणुकीचा आरोप

> सरकारच्या आदेशाचा दुरुपयोग करून शिक्षकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप

> काही संस्थाचालक, मुख्याध्यापक मर्जीत नसलेल्या शिक्षकांना मुद्दामहून देतात त्रास

> शाळेत जाताना कोरोनाची लागण होण्याची बहुतांश शिक्षकांना वाटतेय भीती

> शाळेच्या जवळ असणाऱ्या शिक्षकांना मुभा, तर दूर राहणाऱ्या शिक्षकांना बोलावतात

> कोरोनाचा प्रसार थांबल्यानंतर शिक्षक, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची विनंती

प्रादुर्भाव नसेल तर जाण्याची तयारी

> 01 लाखापेक्षा अधिक कोचिंग क्लासेस राज्यभरात. त्यांच्यावर खर्चाचे आेझे

> शिक्षकांकडे प्रशासकीय कामकाज नसते. त्यामुळे त्यांना शाळेत बोलावण्यास अनेक शिक्षक संघटनांकडून होतोय विरोध

> कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी ज्ञानदानासाठी शाळेत बोलावल्यास हजर राहण्याची काही संघटनांची तयारी

> 10 लाखांपेक्षा अधिक खासगी शिक्षकांचे भवितव्य कोचिंग क्लासवर अवलंबून

शिक्षकांच्या अडचणी अशा

> कोचिंग क्लासेसमुळे बेरोजगारी कमी करण्याचे कार्य केले. पण आज तेच संकटात

> उच्च शिक्षण घेऊन ज्यांना नोकरी मिळाली नाही, असे अनेक तरुण या व्यवसायात

> उदरनिर्वाह कोचिंग क्लासवर अवलंबून असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ

> उत्कृष्ट शिकवणी देणाऱ्या क्लासेसमधील अनेक शिक्षक करताहेत मिळेल ते काम

> खर्च भागवला जात नसल्याने काही क्लासेस चालकांनी बंद केला व्यवसाय

आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले

शैक्षणिक क्षेत्र वगळता सर्वच व्यवसाय सुरू आहेत. आम्हाला सरकारकडून अनुदान वगैरे मिळत नाही. आम्हाला इमारतीचे भाडे, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पगारही द्यावे लागतात. गेल्या आठ महिन्यांपासून पूर्ण आर्थिक गणित बिघडले, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे क्लासेस सुरू करण्याची मागणी केली. -प्रा. पांडुरंग मांडकीकर, अध्यक्ष, कोचिंग क्लास असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

बातम्या आणखी आहेत...