आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:स्कार्पिओ जीप भाडेतत्वावर नेऊन चालकाचा खून; तिघे जण हिंगोली पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत गारमाळ येथील एका जीप चालकाचा जीप भाडेतत्वावर नेऊन त्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. 19 पहाटे तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत गारमाळ येथील युसूफ नौरंगाबादी हे स्कार्पिओ जीप चालवितात. दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी आरोपींनी त्याची जीप भाडेतत्वावर नेली. आरोपींनी अंबाजोगाई रोडवरील एका ढाब्यावर भरपूर मद्यप्राशन केले. त्यानंतर चालक युसुफ नौरंगाबादी यांचा गळा आवळून खुन करून किल्लारी पोलिस ठाण्यांतर्गत एका शेतात ऊसाच्या शेतात नेऊन टाकले.

दरम्यान, युसुफ हे घरी आले नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरु केला. मात्र त्यांच्या भ्रमणध्वनीवरही संपर्क होत नसल्याने त्यांनी ता. 12 ऑगस्ट रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन केनेकर, जमादार शेख शकील, शेख मुजीब, गजानन होळकर, गणेश लेकुळे यांच्या पथकाने त्यांचा शोध सुरु केला. यामधे पोलिसांनी आंबाजोगाई रोडवरील ढाब्यावर चौकशी केली असता त्या ठिकाणी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली.

त्यावरून पोलिसांनी लातुर भागातून जीप जप्त केली. तर किल्लारी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील शेतात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी असलेला मृतदेह युसुफ नौरंगाबादी यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 18 रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी जीप मधील त्या तीघांचा शोध सुरु केला. त्यासाठी पथकेही स्थापन केली. पोलिसांच्या पथकाने आज पहाटे तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...