आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:पालिकेत नोंद नसलेल्या 11 हजार मालमत्तांचा शोध; एकूण आकडा 2 लाख 91 हजार, कर आकारणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाकडे नोंद नसलेल्या अनेक मालमत्ता शहरात आहेत. त्यांच्याकडून मालमत्ता कर प्रशासनाला मिळत नसल्याने मनपाने मागील वर्षभरापासून अशा मालमत्ता शोधण्याचे काम हाती घेतले आहे. मागच्या वर्षीपर्यंत २ लाख ८० हजार मालमत्तांची मनपाकडे नोंद होती. या शोधमोहिमेमुळे त्यात ११ हजार मालमत्तांची वाढ होऊन हा आकडा २ लाख ९१ हजारांपर्यंत पोहोचला आहे. या मालमत्तांची मोजणी करून क्षेत्रफळ व इतर बाबींप्रमाणे मोबाइल नंबर अपडेट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मनपाने एमआयपीएल कंपनीला या कामाचे कंत्राट दिले असून १८० कर्मचारी काम करीत आहेत, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली. महापालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाने यंदा १६७ कोटी १८ लाख रुपयांच्या वसुलीचा टप्पा गाठला. गेल्या काही वर्षातील ही विक्रमी वसुली मानली जाते. एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करवसुलीचे काम सुरू होण्यापूर्वी ज्या मालमत्तांना अद्याप कर आकारणी झालेली नाही त्या मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी थेटे यांनी सोमवारी वॉर्ड अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. विक्रमी करवसुली झाल्याबद्दल या बैठकीत त्यांनी वॉर्ड अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

१८० कर्मचारी शोधणार शहरातील नवीन मालमत्ता
कर आकारणी न झालेल्या आणखी मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू करायचे आहे, त्यासाठी १८० कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले जाणार आहे. सर्वेक्षणाची सुरुवात वॉर्ड कार्यालय क्रमांक ३ (सेंट्रल नाका) आणि वॉर्ड कार्यालय क्रमांक ४ (ताठे मंगल कार्यालय) या दोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या वसाहतींपासून केली जाणार आहे. त्यानंतर वॉर्ड कार्यालय क्रमांक एक (टाऊन हॉल) आणि वॉर्ड कार्यालय क्रमांक आठ (सातारा- देवळाई) या भागात मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, असे थेटे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...