आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानातून परतलेल्या गीताच्या कुटुंबीयांचा शोध आता मराठवाडा-तेलंगणाच्या सीमेवरील गावांत घेतला जाणार आहे. मूकबधिर गीताच्या उजव्या नाकपुडीत दक्षिण भारतीय महिलांप्रमाणे छिद्र आहे. शहराप्रमाणे तिच्या गावात इडली-डोशाचा गाडा लागायचा. ऊस, भुईमूग आणि भाताची शेती होती. दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू तिच्या आवडीचा. ती दाक्षिणात्य असल्याचे वाटले. परंतु गावातील रेल्वेस्थानकाचे नाव तेलुगूऐवजी हिंदी आणि इंग्रजीत आहे. यामुळे ती तेलंगणाच्या सीमेवरील गावातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार इंदूरचे पथक रेल्वेमार्गावरील जालना, परभणी आणि नांदेडात तिच्या कुटुंबीयांचा शोध घेणार आहे. मात्र, २ डिसेंबरपासून सुरू होणारी शोधमोहीम २ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
हा अखेरचा प्रयत्न
गीताला आई-वडिलांची खूप आठवण येते. सुषमा स्वराज यांच्या निधनानेही ती व्यथित झाली आहे. तिच्या शोधासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतोय. हा अखेरचा प्रयत्न असेल. आता तिचे पालक नाही मिळाले तर गीताला कायमसाठी अनाथाश्रमात राहावे लागेल. कुणाला माहिती असल्यास आम्हाला कळवावे. -ज्ञानेंद्र पुरोहित, सचिव, आनंद सोसायटी, इंदूर
असे जोडले धागेदोरे
‘दिव्य मराठी’शी बोलताना ज्ञानेंद्र म्हणाले, गीताच्या उजव्या नाकपुडीत छिद्र आहे. उत्तर भारतात डाव्या नाकपुडीत छिद्र असते. तिची अंगकाठी आणि जेवणाच्या सवयी दाक्षिणात्य आहेत. ती पायात काळा दोरा बांधते. परंतु तिच्या आसपास, स्टेशनवर तेलुगूऐवजी देवनागरी आणि इंग्रजीतील पाट्या होत्या. गावातून वाफेचे इंजिन धावायचे. पण मराठवाडा वगळता बहुतांश मार्गांवर २५-३० वर्षांपासून विजेची इंजिने धावतात. तिच्या गावात ऊस, भुईमूग आणि भाताची शेती होते. हे पीक मराठवाड्यातच घेतले जाते. जेवणात इडली-डोसा असायचा. गावात इडली-डोशाचा गाडा लागायचा. उत्तरेतील मोठ्या शहरात असा गाडा असतो. पण केवळ दक्षिणेतील गावातही हे गाडे लागतात. गीता रेल्वेने अमृतसरला आणि तेथून घाबरून समझौता एक्स्प्रेसमध्ये लपून बसली. मराठवाड्यातून जाणारी सचखंड एक्स्प्रेस अमृतसरला जाते. गीताच्या गावात रेल्वेेस्टेशन आणि जवळच नदी आहे. त्यात अंघोळ करून लोक देवीच्या मंदिरात दर्शनाला जातात. याच गावात एक प्रसूती रुग्णालयही होते. तिच्या गावाजवळ अमरीश पुरीच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले हाेते. यावरून आमचा शोध आंध्र, तेलंगणावर आला. परंतु स्टेशनच्या पाट्यांवरील भाषेमुळे आम्ही दोन्ही राज्यांच्या सीमेवर थांबलो. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील गावात तिचे कुटुंब असावे, असा अंदाज आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.