आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव यात्रा:सावरकर यात्रेचा दुसरा दिवस; भाजपचे कार्यकर्तेच वैतागले

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपतर्फे सुरू करण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेचा दुसरा दिवस होता. भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेणुका मंदिरापासून निघालेल्या या यात्रेचा टीव्ही सेंटर येथे समारोप करण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी सडेतोड उत्तर देत जागा दाखवून दिल्याची आठवण केणेकर यांनी या वेळी करून दिली. दरम्यान, पक्षाकडून येणाऱ्या सततच्या कार्यक्रमांमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये वैतागल्याची भावना आहे.

४ आणि ५ एप्रिल रोजी ही गौरव यात्रा पूर्व विधानसभा क्षेत्रात राहील. सहकार आणि ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे त्याचे नेतृत्व करतील, तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यावर सोपवली आहे. मंडळनिहाय या सावरकर गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी आगामी महापालिका निवडणुकीपोटी उसने अवसान आणत काम करीत आहेत. वन बूथ टेन यूथ, पन्ना प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या बैठका, सभा, संमेलने, नामांतर समर्थनार्थ आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, मन की बात आदींचा भडिमार सुरू आहे. काही काळ तरी विश्रांती मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. यामुळे या यात्रेत कार्यकर्ते गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे.