आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कुरियरने मागवलेल्या 49 तलवारी, कुकरी जप्त; एक आरोपी अटकेत; पूर्वी आइस्क्रीम विक्री करणाऱ्या दानिशच्या साथीदारांचा पोलिसांना शोध

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुरियरवर लाकडी साहित्याचे नाव, आत तलवारींचा साठा

ऑनलाइन ऑर्डर देऊन तलवारी, कुकरी, गुप्ती यासारखी घातक शस्त्रे कुरियरने मागवल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा शहरात समाेर आला आहे. मागील काही दिवसांमध्ये अशी जवळपास १०० शस्त्रे मागवण्यात आली आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी कुरियरची गाडीच जप्त केल्यानंतर आधी पाच तलवारी हाती लागल्या. मात्र, हे मागवणारा इरफान खान ऊर्फ दानिश खान पिता अय्युब खान (२०, रा. जुना बायजीपुरा) याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्या ताब्यातून तब्बल ४९ शस्त्रे जप्त करण्यात आली. यापूर्वी त्याने ४० ते ४५ शस्त्रे मागवल्याची कबुली दिली. रविवारी न्यायालयाने त्याला ६ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

ब्ल्यू डार्ट कुरियर कंपनीच्या चारचाकी टाटा एस वाहनातून शस्त्रे मागील काही दिवसांपासून शहरात येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली हाेती. शुक्रवारीही काही शस्त्रे येणार असल्याचे त्यांना कळाले. सोनवणे यांनी ही बाब उपायुक्त दीपक गिऱ्हे यांना सांगितली. गिऱ्हे यांच्या सूचनेनुसार साेनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेव्हन हिल्स येथे कुरियरची गाडी अडवून तपासणी केली असता त्यात पाच धारदार तलवारींचे पार्सल आढळून आले. दानिश नावाच्या व्यक्तीने ते मागवल्याचे समोर आल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. मात्र, कुरियरवर दिलेला पत्ता खोटा निघाला.

एटीएस स्वतंत्र तपास करण्याची शक्यता
शस्त्रे जप्त केल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता स्वत: रात्री बारा वाजता जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर गुन्हा जिन्सीकडे वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. या शस्त्र तस्करीच्या प्रकरणांमुळे एटीएस पथकदेखील सतर्क झाले. रविवारी ते देखील जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाले. सोमवारी हे पथकही आराेपीची चाैकशी करणार आहे.

कायम पत्ता बदलला, क्रमांक चुकीचा दिला
कुरियर कंपनीकडे रेकॉर्ड तपासले असता शस्त्रांच्या पॅकिंगवर लाकडी सजावटीचे साहित्य लिहिलेले होते. दानिशने ही शस्त्रे मागवताना चुकीचा पत्ता, फाेन क्रमांक दिला हाेता. कर्मचारी गेल्यानंतरही पत्ताच चुकीचा असल्याचे निघाले. दानिशने कधीच थेट कुरियर स्वीकारले नाही. तो स्वत: कंपनीच्या गोडाऊनमध्ये किंवा ट्रॅक करून रस्त्यात स्वीकारत असे.

अजमेर कनेक्शन, ऑनलाइन कंपनी पंजाबची

  • दानिश पूर्वी आइस्क्रीम विकत होता. अजमेर येथे गेल्यानंतर त्याने काही वेळेला शस्त्रे खरेदी केली होती. मात्र, तेथूनच त्याला स्थानिक मित्रांनी ऑनलाइन शस्त्रांची माहिती दिली.
  • त्यानुसार दानिशने शहरात शस्त्रांची तस्करीच सुरू केली. ‘लग्नाला ५०० रुपये रोजाने तलवारी देत आहे’ असे अजब उत्तर त्याने पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत दिले. मात्र, ताे एक तलवार दानिश ३ ते ३५०० रुपयांना विकत असल्याचे समेार आले.
  • प्रत्येक शस्त्रामागे किमान हजार रुपये कमावत असल्याचे समाेर आले. विशेष म्हणजे, आणखी दोन-तीन ठिकाणी त्याने तलवारी लपवून ठेवल्या होत्या. त्याच्या मित्रांचादेखील पोलिस आता शोध घेणार आहे. प्रेमविवाह केल्याने दानिश आई- वडिलांपासून वेगळा राहतो.
बातम्या आणखी आहेत...