आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश न्यायाधीशाने नव्हे, तर मुंबईत राहणारे न्यायमूर्ती नारायणराव चंदावरकर यांनी जन्मठेप सुनावली होती, असे मत प्रख्यात साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बाबासाहेबांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य नाट्यगृहात मंगळवारी त्यांचे व्याख्यान झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.
‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर ते म्हणाले, ‘जगातील बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मूल्ये आहेत. बाबासाहेबांनी त्यात ‘सामाजिक न्याय’ या चौथ्या मूल्याचा समावेश केला. जात मानत नाही तो आंबेडकरवादी असतो, जात मानणारा आंबेडकरवादी कदापि होऊ शकत नाही. बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे तर समस्त बहुजनांचे नेते आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव येथे बहिष्कृत हितकारिणी सभा घेतली होती. या सभेतच महाराजांनी भाकीत करून बाबासाहेब बहुजनांचे नेते होतील, असे म्हटले होते. तेव्हापासून बाबासाहेबांनी मानवमुक्तीच्या चळवळीला सुरुवात केली होती. तेव्हा त्यांच्या चळवळीत अन्य समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होते. ओबीसी, एसबीसी हे शब्दप्रयोग त्यांनीच पहिल्यांदा केले होते.
गौतम बुद्धांनंतर असंख्य लाटा आल्या, पण बाबासाहेबांनी घडवून आणलेली सामाजिक परिवर्तनाची लाट सर्वात मोठी आहे. बाबासाहेब आणि महात्मा गांधी या दोघांनाच भूगोल माहिती होता. अखंड भारतातील सर्व जाती-धर्मांची माहिती होती. बाबासाहेबांचे अजूनही संकल्प अपुरे आहेत. महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या वाती पेटवल्या. बाबासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण संस्था उभारल्या. भारतीयांनी धर्माचा, जातीचा, भाषेचा अहंकार न बाळगता राष्ट्रप्रेमाची जोपासना करावी. बाबासाहेबांनी सांगितलेल्या वाटेने जाण्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्याय नाही,’ असेही त्यांनी म्हटले. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संजय सांभाळकर यांची परिस्थिती होती.
‘एंट्रन्स टू पॉलिटिक्स स्वतंत्र विभाग करणार’ यूजी आणि पीजीला भारतीय संविधानाचा अभ्यासक्रम लागू करणारे देशातील पहिले विद्यापीठ असल्याचे कुलगुरू म्हणाले. बाबासाहेबांच्या ‘स्कूल ऑफ एंट्रन्स टू पॉलिटिक्स’ या संस्थेला आपण प्रत्यक्षात आणले. सध्या प्रमाणपत्र कोर्स सुरू आहे. पुढील वर्षी पीजी डिप्लोमा करू. त्यानंतर स्वतंत्र विभाग अस्तित्वात आणू, अशी घोषणाही कुलगुरूंनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.