आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य:वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंकेंचा राजीनामा; आमदारकी न मिळाल्याने नाराज

औरंगाबाद| संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीने साहित्य, कला, संगीत आदी क्षेत्रातील १२ जणांची यादी राज्यपालांकडे दिली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वक्ता सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांचा समावेश होता. परंतु, आघाडी सरकारने आमदार म्हणून सोळुंके यांची निवड केली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मेसेजद्वारे पाठवला आहे. आता पक्षाची ध्येयधोरणे पचनी पडत नसल्याने व शिर्डी येथील चिंतन मेळाव्यात कीर्तन सुरू असताना जो गोंधळ घातला गेला. त्यामुळे सोळुंके शिबिर सोडून निघून आले. साेळुंकेसह अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर पाटील यांनी सोळुंके यांच्याशी संवाद साधून थोडे थांबावे, शरद पवार यांच्यासोबत लवकरच बैठक होईल. त्यानंतर निर्णय घ्यावा, असे कळवले आहे. मात्र, या राजीनामा नाट्यामुळे शहरासह मराठवाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत साळुंके यांनी प्रचारसभेतून वेगळी छाप सोडली होती. साडेतीन वर्षांपासून त्यांनी राज्यभर मेळावे घेऊन पक्षासाठी दर्जेदार वक्ते घडवण्याचे काम केले. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने त्यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता. परंतु, तो राष्ट्रवादीला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे ते राजीनामा देत असल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद शहर-जिल्ह्यात राष्ट्रवादी नावालाच आहे.

मराठवाडा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार सोडले तर उर्वरित ठिकाणी एनसीपीचे अस्तित्व तळाला गेले आहे. त्यामध्ये सुधारणा करणे व पक्ष संघटन बळकटीकरणासाठी गत पंचवार्षिक निवडणुकीत प्रयत्न झाले होते. त्यानुसार सोळुंके यांची वक्ता सेल प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. आमदारकीचा शब्द पूर्ण करता आला नाही. हे प्रकरण अजूनही वादात आहे. न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

पदाधिकारी म्हणाले, आमची बाजू ऐकून घेतली जात नाही हिंगोली जिल्ह्याचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजा कदम यांनी सोळुंके यांच्या राजीनाम्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, वक्ता प्रशिक्षण विभागातील पदाधिकाऱ्यांना अधिवेशनात, कार्यक्रमात, चर्चासत्रात बोलावले जात नाही. आमची बाजू ऐकून घेतली जात नाही. चिंतन शिबिर कशासाठी घेत आहोत? वक्ता सेल विभागाची पदे म्हणजे भिडे गुरुजींनी कपाळाला लावायला दिलेली टिकली आहे काय? असा प्रश्न विचारला आहे. अमरावती जिल्ह्याचे वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप येवले म्हणाले, वैचारिक, नम्र, संयम व माणूस जोडण्यासाठी २४ तास काम करणारे सोळुंके यांना राजीनामा देण्याची वेळ ओढवण्यासारखे दुर्दैव नाही. त्यामुळे चिंतन करण्याची वेळ असल्याचे नमूद केले आहे. अशाच प्रकारे सर्वस्तरातून पडसाद उमटू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...