आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:पाणीपुरवठ्याच्या कामाचा प्रस्ताव 15 जूनपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवा : खंडपीठ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१६८० कोटींच्या नव्या पाणी योजनेत जायकवाडी येथे पंप हाऊस उभारण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला १५ जूनपूर्वी पाठवावा. मंत्रालयाने त्यावर आठवडाभरात निर्णय घ्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीपकुमार मोरे यांनी मंगळवारी (७ जून) दिले. पुढील सुनावणी २३ जून रोजी होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (एमजेपी) ४० दिवस कामामध्ये गंभीरपणे प्रगती केली नाही, याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त करताना प्रत्येक बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचीही दखल घ्यावी, असेही खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणात खंडपीठाने अॅड. सचिन देशमुख यांची न्यायालयीन मित्र (अमॅकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली आहे. सिडकोतील श्रीहरी अनंत शिरोळे व इतरांनी अॅड. अमित मुदखेडकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत राज्य वन्यजीव मंडळाच्या प्रधान अधिकाऱ्यांसह पर्यावरणमंत्र्यांच्या उपस्थितीत ६ जूनला बैठक घेतली. त्यात जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात पाणीपुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या विहिरीच्या कामाच्या बांधकामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत, असे सहायक सरकारी वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात एमजेपीकडून अॅड. विनोद पाटील, मनपातर्फे अॅड. संभाजी पाटील, सरकारतर्फे अॅड. एस. जी. सांगळे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...