आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद दाराआड चर्चा:खासदार सातव कुटुंबियांपैकी एकास मिळणार राज्यसभेची उमेदवारी? काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांचा गोपनीय कळमनुरी दौरा

कळमनुरी, हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी दौरा केला. या दौऱ्याचे स्वरूप गुप्त ठेवण्यात आले होते. सोबतच, कुणालाही फोटो काढण्याची सुद्धा मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे आल्यानंतर वेणुगोपाल यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. यात राजीव सातव यांच्या कुटुंबातील एकाला त्यांचा राजकीय वारसा मिळणार एवढेच नव्हे, तर राज्यसभेचे सदस्यत्व देणार अशा चर्चा रंगल्या. याबाबत अद्याप कुठलेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी अत्यंत कमी वयात पक्षासाठी मोठी जबाबदारी स्विकारून ती यशस्वीपणे पार पाडली आहे. गुजरात राज्यात दोन हात करून सौराष्ट्रातून विधानसभेचे 28 उमेदवार विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या शिवाय पक्षांतर्गत विविध समित्यांमध्ये तसेच केंद्र शासनाच्या विविध समित्यांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे निधन संपूर्ण देशाला तसेच काँग्रेस पक्षाला चटका लावून गेले.

कार्यकर्त्यांना सुद्धा फोटो काढण्यास मनाई
दरम्यान, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनीटे चर्चाही केली. अत्यंत गोपनिय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबियांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यानंतर त्यांनी खासदार सातव यांना श्रध्दांजली अर्पण करून दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी, खासदार राहूल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनिय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

पदाधिकाऱ्यांशी संवाद
यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, प्राचार्य बबन पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, नंदकिशोर तोष्णीवाल, बापुराव घोंगडे, विलास गोरे, केशव नाईक, डॉ. सतीष पाचपुते, एस. पी. राठोड, रमेश जाधव, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन सातव कुटुंबातील एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...