आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावय वर्षे ५९... पण जिद्द आणि इच्छाशक्ती तरुणांना लाजवणारी. मग एक दिवस मनाशी खूणगाठ बांधली आणि अनेक गोष्टींचा त्याग करून सीमेवर अहोरात्र पहारा देत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी सायकलस्वारीची मोहीम आखली. तब्बल सात राज्यांतून ४ हजार ३०० किमीचे अंतर कापून ही मोहीम दीड महिन्यात फत्तेही केली... औरंगाबाद येथील या धाडसी सायकलपटूचे नाव आहे अनंत रंगनाथराव ढवळे. या मोहिमेत त्यांच्यासोबत रमाकांत महाडिक, पनवेलचे पवन चांडक, अकलूजचे राजेंद्र धायगुडे, मुंबईचे रामेश्वर भगत सहभागी होते. कुठे मुसळधार पाऊस, कुठे दरड कोसळण्याचा धोका, कधी कडक थंडी तर कधी अत्यंत जोखीमेचे अरुंद मार्ग, अशा सर्व आव्हानांवर मात करत ढवळे आणि सहकाऱ्यांनी ही मोहीम पूर्ण केली. औरंगाबादेत पाटबंधारे विभागातून निवृत्त झालेल्या ढवळे यांना बालपणापासूनच सायकलिंगचा छंद आहे. गेल्या वर्षी त्यांनी सायकलवर तब्बल २८०० किमीची नर्मदा परिक्रमा केली होती.
थरारक अनुभव...
- राजस्थानच्या उदयपूर घाट रस्त्याने जाताना अनेकदा आमच्या सायकली बिघडल्या. दुरुस्तीचे साहित्य सोबत होतेच. कडाक्याच्या थंडीने येथे आमच्या क्षमतेची येथे परीक्षाच घेतली.
- अरुणाचलमध्ये सतत पाऊस आणि दलदलीच्या रस्त्यांमुळे आव्हान होते. अनेकदा मार्गावर दरड कोसळत होते. घनदाट जंगल, डोंगराळ भागातील अरुंद मार्ग व २०-२५ किमी भाग निर्मनुष्य. अशा स्थितीत मार्गक्रमण करताना अनेक ठिकाणी सैनिकांनी मदत केली.
- सैनिकी चेक-पोस्टवर नोंदणी करून पुढे जावे लागत होते. अखेर नुरानांग येथील १९६२ च्या भारत-चीन युद्धातील शहिद सैनिकांच्या स्मृतिस्थळी आम्ही पोहोचलो, सैनिकांना अभिवादन केले.
- चीन सीमेवरील शेवटचे गाव तिबूतू पोस्टवर या सैनिकांना मानवंदना दिली.सैनिकांनीही आदरातिथ्य केले. पोस्टवर बाहेरील व्यक्तींना थांबू दिले जात नाही, मात्र परवानगी घेतल्याने सैनिकी अधिकाऱ्यांनी त्याच्या छावणीत राहण्याची व्यवस्था केली.
अंधारातून प्रकाशाकडे...
सैनिकांबद्दल आदर व्यक्त करण्याची इच्छा होती. निवृत्तीनंतर रमाकांत महाडिक यांच्या सहकार्याने ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ मोहीम आखली. सूर्य मावळतो त्या पश्चिम गुजरात-पाक (गुहार मोती गाव) सीमेकडून सूर्य उगवणाऱ्या अरुणाचल-चीन सीमेवरील (तिबुतू गाव) सैनिकांची भेट घेऊन त्यांना सॅल्यूट करायचा, अशी मोहीम २६ जानेवारीला सुरू केली. रोज १५० ते २०० किमी प्रवास करत गुजरात, राजस्थान, उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल, आसाम व अरुणाचल या ७ राज्यांतील जीवन, संस्कृती अनुभवत देशप्रेमाची भावना जागृत केलीच, निरोगी आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंगचे महत्त्व व इंधन वाचवा असा संदेशही दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.