आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून सत्कार स्वीकारत असतानाच जिन्सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे (५५) यांच्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलिस नाईक मुजाहेद शेखने (५५) हल्ला केला. त्यांच्या पोटात, छातीत दोन वेळा चाकू खुपसला. तिसरा वार तळहातावर केला. त्यांच्यावर अॅपेक्स रुग्णालयात रात्री उशिरार्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. समंजस, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावरील हल्ल्याने पोलिस दल हादरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर झालेला मुजाहेद शिवीगाळ करत होता. त्याला समजावून सांगण्यासाठी कार्यक्रम थांबवून केंद्रे गेले. तेव्हा त्याने पहिला वार त्यांच्या छातीत तर दुसरा वार पोटात केला. तिसरा वार करण्याच्या प्रयत्नात असताना केंद्रे यांनी हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या तळहात चाकूने कापला गेला. काय झाले हे कळायच्या आत रक्तबंबाळ झालेले केंद्रे जमिनीवर कोसळले. ते पाहून ठाण्यातल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर मुजाहेदने स्वत:लाही दुखापत करण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध पडल्याचेही नाटक केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपयुक्त दीपक गिऱ्हे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. काही वेळात त्यांची मुलगीही दाखल झाली. नांदेडला असलेले कुटुंब औरंगाबादकडे निघाले. केंद्रे यांना आठ पिशव्या रक्त देण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वरिष्ठांनी विरोधात अहवाल पाठवल्याचा राग काही वर्षांपूर्वी विशेष शाखेत काम करत असताना मुजाहेदने तत्कालीन पोलिस निरीक्षक सोपान बोरसेंवरही हल्ला केला होता. त्यामुळे त्याला बरखास्त करून काही वर्षांनी रुजू करून घेण्यात आले. जिन्सीतून नुकतीच त्याची बदली बेगमपुरा ठाण्यात झाली होती. त्यापूर्वीच त्याचा सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूरही झाला होता. कामात कायम चुका, गैरहजेरी, वादामुळे त्याच्याविरोधात अहवाल पाठवल्याचा राग त्याच्या मनात होता, असे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.