आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये ९ ऑगस्ट २०१८ रोजी मोठ्या प्रमाणावर तोडफोड व जाळपोळ झाली होती. त्यामुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. अनेक उद्योजक, अधिकारी व कामगारांना मारहाणही झाली होती. या घटनेनंतर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी एंड्रेस हाउजर कंपनीच्या शेजारील भूखंडावर ‘रांजणगाव पोलीस चौकी’ सुरू केली होती. परंतु ही पोलिस चौकी बंद पडल्याने उद्योजकांत असुरक्षिततेची भावना आहे. ही चौकी नव्याने सुरू करण्यात यावी, अशी मागणी उद्योजकांतून होत आहे.
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ हजारांवर लहान-मोठे कारखाने तसेच औद्योगिक परिसराला लागून असणारा रहिवासी परिसर आहे. यात जोगेश्वरी, रांजणगाव, घाणेगाव, वळदगाव, वडगाव, पंढरपूर, विटावा, साजापूर या ग्रामपंचायतीही आहेत. त्यामुळे संबंधित पोलिस ठाण्यातील १०० पोलिस कर्मचारी व १० अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ येथे कमी पडते. त्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाणे गरजेचे आहे. त्याचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलेला आहे. स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज : सध्या ज्या परिसरात बंद पडलेली पोलिस चौकी आहे त्या परिसरात ३०० मोठे तर १७०० लहान उद्योग आहेत. याशिवाय रांजणगाव, विटावा आणि जोगेश्वरी गट नंबरमध्येही उद्योग आहेत. एखादी घटना घडली तर कारखान्यापासून ६ किमी अंतरावरील एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होतो.
उद्योजकांच्या मागणीकडे दुर्लक्षच : सध्याच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून कारखान्यांचे अंतर जास्त असल्याने उद्योजक, कामगार, अधिकारी यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनी परिसरातच पोलिस तैनात हवेत. याच हेतूने चार वर्षांपूर्वी ही पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. अवघ्या दीड वर्षातच ती बंद पडली. नंतर उद्योजकांनी अनेकदा चौकी सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पोलिस चौकीच्या मागील बाजूच्या मोकळ्या भूखंडातून मुरूम चोरी सध्या या पोलिस चौकीच्या मागील बाजूस असणाऱ्या मोकळ्या भूखंडातून मुरूम चोरी सुरू आहे. मुरूम माफियांना अडवण्यास गेलेल्या उद्योजकाच्या अंगावर ट्रक घालण्याचे धाडस माफियांनी केले. मात्र, तिथे पोलिस चौकी सुरू असती. पूर्वीप्रमाणेच २ कर्मचारी तैनात असते तर हा प्रकार घडला नसता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.