आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरो सर्वेक्षण:औरंगाबाद शहरातील तब्बल 1 लाख 70 हजार लाेकांना काेराेना हाेऊन गेला; 12 टक्के लाेकांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील झोपडपट्टीत 14.56 टक्के तर इतर भागात 10.64 टक्के अँटिबॉडीज आढळल्या

शहरात सुमारे १५ हजार काेराेनाचे रुग्ण सापडल्याचे स्वॅब तपासणीतून समाेर आले असले तरी वास्तव वेगळेच आहे. १५ लाख लाेकसंख्येपैकी ११.८० टक्के म्हणजे तब्बल १ लाख ७० हजार लाेकांना काेराेनाची लागण हाेऊन गेली, मात्र चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे त्यांना त्याचा काही त्रास जाणवला नाही. या लाेकांच्या शरीरात काेराेनाशी लढणाऱ्या अँटिबाॅडीज (प्रतिद्रव्ये) तयार झाल्याचे सिरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समाेर आले आहे.

झोपडपट्टी भागात अँटिबाॅडीज आढळणाऱ्या लाेकांचे प्रमाण सर्वाधिक १४.५६ %, तर इतर भागात सरासरी १०.६४ टक्के दिसून आले. मनपाने ११५ वाॅर्डात हे सर्वेक्षण केले, त्यापैकी पाच वाॅर्डांतील नागरिकांत शून्य टक्के अँटिबाॅडीज आढळल्या.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे निष्कर्ष जाहीर केले. घाटी, एमजीएम, मनपा आणि जैन संघटनेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षणाची जबाबदारी डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. ज्योती बजाज, डॉ. स्मिता अंदूरकर, डॉ. मोहम्मद घोडके, डॉ. श्रुती गायकवाड, मनपा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींनी पार पाडली.

जटवाडा रोड, जवाहर कॉलनीत

जवाहर कॉलनी-शास्त्रीनगरात (वॉर्ड ७७) कोरोनाचा उद्रेक जास्त होता तरीही येथे शून्य टक्के अँटिबाॅडीज आढळून आल्या. जय विश्वभारती कॉलनी (वॉर्ड ९९), विश्वासनगर ( वॉर्ड ११), संत ज्ञानेश्वरनगर (वॉर्ड ३०) आणि जटवाडा रोड (वॉर्ड ४) या वॉर्डांमध्येही शून्य टक्के प्रमाण दिसून आले.

सिल्लेखाना, नूतन काॅलनीत जास्त

शहरातील झोपडपट्टीबहुल आणि बिगर झोपडपट्टी भाग असे वर्गीकरण करून सर्वेक्षण केले. १० ते १७ वर्षे वयोगटात ३० क्लस्टर करण्यात आले होते. झोपडपट्टीतील १४.५६ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. इतर भागात मात्र १०.६४ टक्के प्रमाण आहे.

८१ % बाधितांना स्रोतच माहीत नाही

अँटिबाॅडीज आढळलेल्या ८१ % लोकांनी काेराेना रुग्णाच्या कधीही संपर्कात आले नसल्याचे सांगितले. १२ % लाेक त्याविषयी खात्रीपूर्वक सांगू शकले नाहीत. तर ७ टक्के लाेकांनी संपर्कात आल्याचे सांगितले. गुगल फॉर्मनुसार सर्व्हेत प्रश्नावली भरून घेण्यात आली.

पुण्यात सर्वाधिक ५१ टक्के, आैरंगाबादेत सर्वात कमी

काेराेनाचा कितपत फैलाव झाला याचा अभ्यास करण्यासाठी सिराे सर्व्हे केला जाताे. १० ते १६ ऑगस्टदरम्यान ११५ वाॅर्डांतील ४,३२७ जणांचे प्रातिनिधिक स्वरूपात रक्तनमुने घेण्यात आले. काेराेनाचा सर्वाधिक फैलाव झालेल्या मुंबईत ४० टक्के, पुण्यात ५१ टक्के, तर दिल्लीतील २७ टक्के लाेकांमध्ये अँटिबाॅडीज आढळून आल्या. तुलनेत आैरंगाबादेत प्रमाण कमी आहे. मात्र, या तिन्ही शहरांत सर्वाधिक संसर्गाच्या भागातच सर्वेक्षण झाले. आैरंगाबादेत मात्र सर्व ११५ वाॅर्डांत, सर्वच वयाेगटात चाचण्या करण्यात आल्या.

सप्टेंबरमध्ये उद्रेक वाढला तरीही लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी

सप्टेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती असली तरीही आता लॉकडाऊन करणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जास्तीत जास्त टेस्टिंग, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हाच काेराेनावर उपाय आहे. तपासणी बंद करा, असे शासनाचे निर्देश असले तरीही आपण सचिवांशी चर्चा करून औरंगाबादेत तपासणी सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काेराेनाची साथ हळूहळू कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसत आहे, पण ती लक्षणीयदृष्ट्या कमी होण्यासाठी अजून काही महिने लागतील. काही दिवसांनी परत सिरो सर्वेक्षण केल्यास त्याविषयी खात्रीने काही निष्कर्ष काढता येतील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

१७ वयापर्यंत ८.६ % प्रमाण

स्वॅब पाॅझिटिव्ह आलेल्या ५६ पैकी २२ लाेकांमध्ये, तर निगेटिव्ह आलेल्या १६.६६ टक्के व्यक्तींमध्ये अँटिबाॅडीज आढळून आल्या. लहान मुलांच्या १० ते १७ वयोगटातील प्रमाण ८.६ टक्के आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.