आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिन्सीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर स्वेच्छानिवृत्ती घेतलेला कर्मचारी शेख मुजाहेद शेख उस्मान याने मंगळवारी चाकूने प्राणघातक हल्ला करत पोटात दोन, हातावर एक वार केला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन्ही जखमा पाठीपर्यंत खोल गेल्या आहेत. यकृताच्या मुख्य रक्तवाहिनीला गंभीर जखम आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यास आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येईल, वरिष्ठ अधिकारी व केंद्रे यांच्या कुटुंबाला सांगितले. मूळ नांदेडचे असलेले केंद्रे जिल्हा बदलीत २०१९ मध्ये शहर पोलिस दलात रुजू झाले. २१ जून रोजी त्यांनी जिन्सी ठाण्यात तीन वर्षे पूर्ण केले. पोलिस दलातर्फे बुधवारी नियोजित एका कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी नागरिकांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर गब्बर अॅक्शन कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्याचवेळी मुजाहेद ठाण्यात त्यांना शिवीगाळ करत होता. उपनिरीक्षक शेख अश्फाक यांनी त्याला पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
का असे बोलतोय, मी तुझे काय वाईट केले? : केंद्रे यांनी त्याला बोलू द्या, असे म्हणत का असे बोलतोय, मी तुझे काय वाईट केले, असे विचारले. तेव्हा उपनिरीक्षक अश्फाक यांच्या तावडीतून सुटका करवून घेत तो केंद्रेंच्या दिशेने धावत गेला व ‘तुमको अब जिंदा नही छोडता’असे म्हणत चाकू काढून थेट पोटात खुपसला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याच्यावर सहायक निरीक्षक अनिल मगरे यांच्या फिर्यादीवरून भादंवी ३०७, ३५३, ३३२, २९४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर याप्रकरणी तपास करत आहेत.
दुसरा गुन्हा रात्रीतून बेगमपुऱ्यात दाखल : मुजाहेदला तत्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. केंद्रेंवर हल्ला करताना त्याच्याही हाताला चाकू लागल्याने जखम झाली होती. वरिष्ठांनी सहायक फौजदार नाजी रखान पठाण यांना मुजाहेदला घाटीत घेऊन जाण्याचे आदेश दिले. घाटीत नेताच त्याने पठाण यांना शिवीगाळ सुरू केली. त्यांची कॉलर पकडून शर्ट फाडून मारहाण केली. तू पीआय का आदमी है, तेरा भी मर्डर करता, अशी धमकी दिली. त्यामुळे बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंवी ३३२, ३५३ कलमांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. सलगरकर, उपनिरीक्षक अनंता तांगडे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. हल्ल्यामागचा उद्देश, चाकू कोठून आणला, चाकू जप्त करणे, कटात आणखी कोणी सहभागी आहे का, कोणाच्या संपर्कात होता आदीचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.
निरर्थक मागण्या मान्य न केल्याचा राग : मुजाहेदने याआधी विशेष शाखेत कार्यरत पोलिस निरीक्षक सोपान बोरसे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याने त्याला निलंबित केले होते. जिन्सीत रुजू झाल्यानंतर तो अनेकदा तक्रारदारांना शिवीगाळ, आरडाओरड करून हाकलून देत असे. त्याच्या वागणुकीमुळे केंद्रे यांनी त्याचे काम बदलले. मात्र, त्यानंतर त्याच्या तक्रारी वाढतच गेल्या. २०२० मध्ये एका तक्रारदाराला शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर केंद्रे यांच्याकडे त्या महिला तक्रारदारावरच सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, केंद्रे यांनी खोटा गुन्हा दाखल करणार नाही, असे बजावले. त्याचा राग मनात धरून त्याने हायकोर्टात गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली.
मात्र, हायकोर्टानेदेखील याचिका फेटाळली होती. त्याने ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खोटे आरोप केले होते. त्यानंतर स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला. तो मंजूर झाल्यानंतर पुन्हा रद्द करण्याची मागणी केली. परंतु तो रद्द होत नाही, वरिष्ठांचा निर्णय असतो, असे केंद्रे यांनी त्याला समजून सांगितले. रमजानमध्ये त्याच्याकडे पैसे नसल्याने केंद्रे यांनी पैसे दिले होते. अनेकदा तो ठाण्यात नशा करून येत असे, असे ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.