आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नाॅलेज रिपाेर्ट:पवारांनी ‘बीसीजी’ घेतली म्हणून तुम्ही घेऊ नका!

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच ‘बीसीजी’ लस घेतल्याचे पुण्यात जाहीरपणे सांगितले अन‌् मग ‘काेराेनापासून संरक्षणासाठी आपणही असा बूस्टर डाेस घ्यावा का?’ अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्याविषयी डाॅक्टरांकडे चाैकशीही केली जाऊ लागली. मात्र, टीबीसह अनेक आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती ‘बीसीजी’तून मिळत असली तरी काेराेनापासून ती संरक्षण करू शकते का? या प्रश्नाचे अजून काेणत्याही तज्ञाकडे ठाेस उत्तर नाही. त्याबाबत जगभरात संशाेधन सुरू असले तरी अद्याप निष्कर्षापर्यंत काेणीही आलेले नाही. म्हणूनच नवजात बालके वगळता इतरांनी तूर्त तरी ही लस टाेचून घेण्याचा उपद‌्व्याप करू नये, असे आवाहन तज्ञ डाॅक्टरांकडून केले जात आहे.

काेराेनापासून बचाव शक्य आहे का?
बॅक्टेरियांशी लढण्याची प्रतिकारशक्ती बीसीजी लसीतून मिळते. मात्र, काेराेना हा बॅक्टेरिया नसून व्हायरस असल्यामुळे त्यावर ही लस प्रभावी ठरू शकते का, याबाबत अजूनही ठाेस उत्तर नाही.
- सिरम इन्स्टिट्यूटने याबाबत अभ्यास सुरू केला आहे. मानवी चाचणीही सुरू केली आहे. मात्र, अद्याप या चाचण्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसल्यामुळे ठाेस निष्कर्ष बाहेर येऊ शकलेले नाहीत.
- जपान, ब्राझील, भारत यासारख्या देशांत जिथे अनेक वर्षांपासून बीसीजी लसीकरण सुरू आहे तिथे काेराेना संक्रमण कमी असल्याचा निष्कर्ष जागतिक स्तरावरील तज्ञांनी सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच काेराेनाच्या सुरुवातीच्या काळात काढला हाेता. मात्र, ७२ वर्षांपासून लसीकरण हाेत असलेला भारत आजघडीला रुग्णसंख्येत दुसऱ्या, तर मृत्यूसंख्येत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा नियम आपल्याकडे लागू झालेला दिसत नाही.

काय म्हणतात तज्ञ... काेराेनापासून संरक्षण हाेते का याबाबत संशाेधन सुरू; मात्र अद्याप निष्कर्ष न आल्याने सामान्यांनी लसीबाबत विचार करू नये, भारतात ७२ वर्षांपासून फक्त नवजात बाळांनाच दिला जाताेय डाेस

1. गंभीर टीबीसाठीच फायदेशीर
- डॉ. रेणू बोराळकर, अध्यक्ष, बालरोगतज्ञ संघटना

‘या लसीचा फायदा फक्त लहान मुलांमधील टीबी, मेंदूज्वर राेखण्यासाठी हाेताे. गंभीर स्वरूपाचा मेंदूचा टीबी रोखण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. मात्र, ही लस घेणाऱ्यांना सामान्य स्वरूपाचा टीबी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. आपल्या देशात माेठ्या व्यक्तींना ही लस दिली जातच नाही.

2. चाचण्यांचे निष्कर्ष आले नाहीत
- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, काेविड केंद्र आयसीयू प्रमुख, घाटी

काेराेनापासून संरक्षणासाठी बीसीजीचा फायदा हाेऊ शकताे का याचे आयसीएमआर संशाेधन करत आहे. मात्र, निष्कर्ष येईपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाही. बीसीजी लस प्रतिकारक्षमता निर्माण करते, हे खरे आहे. मात्र, ही लस लहान मुलांनाच दिली जाते, माेठ्या व्यक्तींना नव्हे.

3. मनपाकडे अजून प्रोटोकॉल नाही
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा, आैरंगाबाद

काेराेनापासून संरक्षणासाठी बीसीजी लस द्यावी असा काेणताही प्राेटाेकाॅल अजून आमच्याकडे आलेला नाही. लहान मुलांच्या लसीकरणाचेच काम सध्या सुरू आहे. या लसीचा सध्या मनपाकडे भरपूर साठा आहे, कुठलीही कमतरता नाही. सध्या तरी ती लहान मुलांनाच दिली जाते.

4. माेठ्या व्यक्तींनी ही लस घेऊ नये
- डॉ. आनंद निकाळजे, काेविड विभाग प्रमुख, एमजीएम

सध्या या लसीबाबत अभ्यासच सुरू आहे. मात्र, कुठलाही निष्कर्ष आलेला नाही. संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष निघतील व त्यानंतरच लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी ही लस लहान मुलांनाच देणे याेग्य आहे. सर्वसामान्य माेठ्या व्यक्तींनी ती घेणे गरजेचे नाही.

‘टीबी’पासून संरक्षण करते बीसीजी
‘बॅसिलस काल्मेट गेरिन’ असे लसीचे पूर्ण नाव. श्वास- फुप्फुसाचे आजार, क्षयराेगापासून (टीबी) संरक्षण मिळण्यासाठी प्रत्येक नवजात बाळाला दहा दिवसांच्या आत ही लस दिली जाते. जगात सर्वात प्रथम १९२० मध्ये या लसीचा उपयाेग झाला. १९४८ पासून भारतामध्ये तिचा वापर सुरू झाला. १९६२ पासून राष्ट्रीय क्षयराेगविराेधी अभियानाद्वारे हे लसीकरण देशभर सुरू झाले. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत अशा आजारांना राेखण्यासाठी ही लस प्रतिकारक्षमता तयार करते, असे तज्ञ सांगतात. लहान बाळांना सरकारी रुग्णालयात या लसीचा डाेस माेफत मिळताे, तर मेडिकलवरही त्याची किंमत सुमारे २०० रुपयांपर्यंत आहे.

‘एमजीएम’मध्येही संशाेधन : २०० स्वयंसेवकांवर चाचणी, प्रकृती उत्तम
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ‘बीसीजी’मुळे काेराेनापासून संरक्षण हाेऊ शकते का, याचा अभ्यास सुरू केला आहे. देशातील ४० केंद्रांंमध्ये त्याची मानवी चाचणी घेतली जात आहे, त्यात आैरंगाबादेतील एमजीएम संस्थेचा समावेश आहे. काेराेना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या १८ ते ५० वयाेगटातील २०२ स्वयंसेवकांना ‘एमजीएम’ने तीन महिन्यांपूर्वी बीसीजीची लस दिली. यात विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रशिक्षक डॉक्टरांचा समावेश आहे. या सर्वांची आधी काेविड चाचणी केली. तिचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच स्वयंसेवकांच्या डाव्या दंडात लस देण्यात आली होती. पुढील सहा महिने त्यांचे निरीक्षण केले जाणार आहे. मात्र, त्यास अजून तीन महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने अद्याप कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे या प्रयाेगावर अभ्यास करणाऱ्यांनी सांगितले. दर महिन्याला या स्वयंसेवकांच्या प्रकृतीचे निरीक्षण केले जाते. सुदैवाने पहिल्या तीन महिन्यांत यापैकी एकाही स्वयंसेवकाला काेणताही गंभीर आजार झाला नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...