आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुन्हा पवार vs पवार:पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील अंतराची नव्हे तर मधल्या पिढीच्या अस्तित्वाची लढाई : चर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राच्या महाभारतातील निर्णायक लढाई सुरू!

पहाटे पहाटे ‘जाग’ आलेले आणि दिल्या घेतल्या वचनांची शपथ घेणारे अजित पवार पुन्हा थाेरल्या पवारांच्या गोटात आले खरे; पण शस्त्रसंधी झाल्याचे अद्यापही दिसत नाही. ‘पार्थ अपरिपक्व आहे आणि त्याच्या मताला कवडीची किंमत नाही,’ असे म्हणत ‘भीष्माचार्य’ शरद पवारांनी नक्की कुणाला आणि कोणता इशारा दिला आहे? नेहमी शिष्टाई करणारे शरद पवार आक्रमक झाले असतील, तर त्याचे पडसाद काय उमटतील? मुद्दा एका कुटुंबातील कलहाचा नाही, तर राज्याच्या स्थैर्याचा आहे. बुधवारी सुरू झालेला हा गोपाळकाला प्रस्थापित समीकरणांची दहीहंडी फोडणार तर नाही ना, हा मुद्दा कळीचा आहे.

पार्थ पवारांचे जय श्रीराम; भाजपकडून कौतुक

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पार्थ यांनी जय श्रीराम असे टि्वट केले होते की, ‘हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापाशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत.”

त्यानंतर पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. यावरून भाजपच्या गोटातून पार्थचे कौतुक सुरू आहे. भाजपचे नेते पार्थच्या कौतुकाचे टि्वट करत आजोबा व नातवाच्या या घडामोडीत तेल ओतण्याचे काम करताहेत.

पार्थ पवार : अभिनेता सुशांतच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशी करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ यांनी केली होती. पार्थ म्हणाले की,सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी. संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरू करावी”.

शरद पवार : पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह याच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर शरद म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर विरोधाचं कारण नाही.”

शरद पवार V/s अजित पवार

> लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या ईडी चौकशी प्रकरणावेळी अजित पवारांनी अचानक राजीनामा दिला होता. पवार कुटुंबातील कलहामुळेच हा राजीनामा दिल्याचे चित्र त्या वेळी रंगवण्यात आले. नंतर शरद पवारांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. येथूनच अजित आणि शरद पवार यांच्यात अलीकडील असंतोषाची ठिणगी पडली होती.

> अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेला तिकीट देण्यात आले. नंतर त्यांचा पराभव झाला. त्याचाही राग अजित पवार यांच्या मनात आहे.

> विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नंतर हा गोंधळ मिटवताना शरद पवार यांना जो त्रास झाला त्यातूनही अजित आणि शरद पवार यांच्यातील दरी वाढली.

> शिवसेनेचे पारनेरमधील नगरसेवक फोडाफोडी प्रकरणात अजित पवारांच्या भूमिकेवरही शरद पवार नाराज असल्याचे म्हटले जाते.

सुप्रिया V/s अजित पवार

शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण, यावरूनही संघर्ष असल्याचे मानले जाते. कन्या सुप्रिया सुळे याच शरद पवारांच्या खऱ्या वारसदार असे मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे. तर पुतण्या अजित पवार हेच राजकीय वारसदार मानणारा एक वर्ग आहे. मात्र सुप्रिया आणि अजितदादांनी याचा वारंवार इन्कार केला आहे.

रोहित V/s पार्थ

पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय मैदानात उतरल्यानंतर वारसा पुढे कोण नेणार यावरून चर्चा रंगू लागल्या. अजितदादांचे पुत्र पार्थ यांचा लोकसभेत पद्धतशीरपणे पराभव करण्यात आला, असे मानणारा एक गट आहे. रोहित यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी खास ताकद लावण्यात आल्याचे मानणारा दुसरा गट आहे.

सुनंदा V/s सुनेत्रा

शरद पवारांचे राजकीय वारसदार नातू रोहित हेच आहेत असे रोहितच्या मातोश्री सुनंदा पवार यांना वाटते, तर पार्थने पवार घराण्याचा वारसा चालवावा असे त्यांच्या आई सुनेत्रा अजित पवार यांना वाटते, त्यावरून या दोघींत सुप्त संघर्ष असल्याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी असल्याचे वेळोवेळी दिसले आहे. अजित पवारनिष्ठ आणि शरद पवारांचे निष्ठावान असे गट असल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसले आहे.

राष्ट्रवादीत सध्या जयंत पाटील यांची चलती आहे. विधानसभा निवडणुकीत जयंतराव सातत्याने शरद पवार यांच्या सोबत होते. जयंतराव आता राष्ट्रवादीत प्रभावी झाले असून त्यांना मानणारे काही आमदार, कार्यकर्ते पक्षात असल्याचे मानले जाते.

जितेंद्र आव्हाडही शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जातात. मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याशी हस्तांदोलनही टाळले होते.

पहाटेच्या सरकारचा अनुभव घेऊन आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळ‌वणाऱ्या अजितदादांचे पक्षात मोठे वजन आहे.

उपमुख्यमंत्रिपदासह अर्थसारखे अत्यंत महत्त्वाचे खाते अजितदादांचे पक्षातील वर्चस्व सांगते. अलीकडेच विधान परिषद निवडणुकीत अमोल मिटकरी यांना आमदार करण्यात अजितदादांचा मोठा वाटा होता.

आदित्य ठाकरे ‘फॅक्टर’

आघाडीच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांना मंत्रिपद मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थला काहीच मिळाले नाही, एकीकडे आदित्य यांचे वाढते वजन आणि दुसरीकडे पार्थकडे राष्ट्रवादीकडूनच होणारे दुर्लक्ष, टीका यामुळे अजितदादांच्या गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

सरकार किती टिकणार?

आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नसल्याचा दावा नेते करत असले तरी तिन्ही पक्षांतील नाराजीनाट्य वारंवार समोर येत आहे. आता पार्थ पवार यांनी केलेले टि्वट, त्याला भाजपने दिलेला प्रतिसाद, त्यात पवार काका-पुतण्याचे संबंध यावरून सुरू झालेल्या नव्या नाट्यामुळे हे सरकार किती काळ टिकणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

0