आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याआधी खैरेंचा सत्कार कसा?:भरकार्यक्रमात आ. संजय शिरसाट यांचा संताप, खा. जलील यांनी हात पकडत केले शांत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत प्रथमच शिंदे गट व ठाकरे गटाचे नेते एकत्र व्यासपीठावर आले. काही वेळ हास्यविनोद झाले. पण सूत्रसंचालक पोलिस अधिकाऱ्याने सुरुवातीला येऊन बसलेले चंद्रकांत खैरे यांचा सत्कार सर्वात आधी केला. त्यामुळे चिडून आमदार शिरसाट ताडकन उभे राहिले.

'प्रोटोकॉल आहे की नाही?' असे म्हणत शिरसाट कार्यक्रमातून निघून जाऊ लागले. पण, खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना शांत केले व खाली बसवले. पोलिस आयुक्तांनीही शिरसाटांना शांत राहण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खरे. मात्र, शिरसाट यांच्या चेहऱ्यावरील राग यावेळी स्पष्टपणे दिसत होता.

समन्वय समितीची बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी औरंगाबादेत समन्वय समितीची बैठक झाली. आजयर्पंत अशा बैठकांना ‘शांतता समिती’ असे नाव असायचे. यंदा बदल करून ‘समन्वय’ असा उल्लेख करण्यात आला. मात्र, या बैठकीत लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय व शांतता दोन्ही दिसले नाहीत. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इत्मियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अभिजित चौधरी, माजी खासदार चंद्रकांत खैरे किशनचंद तनवाणी यांच्यासह पोलिस व पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

खैरेंचे आधी स्वागत

कार्यक्रमाला सुरूवात झाली तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, त्यानंतर सहकारमंत्री अतुल सावे व खासदार इम्तियाज जलिल यांचा सत्कार केला. शिरसाट हे जलील यांच्या बाजुलाच बसलेले होते. त्यामुळे जलील यांच्यानंतर आपले स्वागत होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, सूत्रसंचालकाने चंद्रकांत खैरे यांचे नाव पुकारले. खैरे यांचे नाव पुकारताच शिरसाट ताडकन उभे राहिले व याबद्दल नाराजी केली. मात्र, याचवेळी खैरे यांनी शिरसाट यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत हसत हसत सत्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही शिरसाट यांचे तातडीने स्वागत करण्याची सूचना सूत्रसंचालकाला दिली.

या सर्व प्रकारावर शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व 'प्रोटोकॉल आहे की नाही?', असा सवाल केला. या रागातच ते कार्यक्रमातून जाण्यासही निघाले. मात्र, बाजुलाच बसलेल्या इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांचा हात धरून त्यांना खाली बसवले. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, शिरसाट यांच्या चेहऱ्यावरील राग यावेळी स्पष्ट दिसत होता.

आता मला मंत्री करा - जलील

समन्वय समितीच्या बैठकीत 20 वर्षांपेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या पदावर राहिलेल्या नेत्यांनीच समस्यांवर बोट ठेवत प्रशासनावरच ताशेरे ओढण्यात धन्यता मानली. त्यामुळे अपेक्षा घेऊन आलेले मंडळ पदाधिकारी चकित झाले. बैठकीत खा. इम्तियाज म्हणाले, ‘महापालिका आयुक्त, तुम्ही नवी आहात. गणेशोत्सवाची भेट म्हणून तरी येत्या वर्षभरात रेल्वेगेटचा विषय मार्गी लागेल, असे आश्वासन तुम्ही द्या. डॉ. कराड साहेब, बँका तुमच्या, तिजोरीचे प्रमुख तुम्ही. रेल्वेमंत्री तुमचे, तर तुम्हीही पुढाकार घ्या, पण मार्गी लावा.’ यावर मंत्री अतुल सावे यांनी ‘आमचे मंत्री तर करतीलच. इम्तियाजजी, तुम्हीही खासदार आहात. जोर लावा,’ असा प्रतिसल्ला दिला. त्यावर इम्तियाज यांनी तत्काळ ‘तुम्ही आता मला मंत्री करा, मी सगळे कामे करतो,’ असे सांगून अतुल सावेंना गप्प केले.

औरंगाबादला 6 मंत्रिपदे, खड्ड्यांचे शेवटचे वर्ष

बैठकीत खड्डे बुजवण्याची विनंती मंडळांनी केली. त्यावर खैरेंनी ‘मनपा नक्कीच खड्डे बुजवतील,’ असा टोला लगावला. आमदार संजय शिरसाट यांनी मात्र मनपावर सडकून टीका केली. ‘अधिकारी समस्या लिहून घेताय, पण उत्सवात रस्त्यावर ते दिसत नाहीत. ठेकेदार कधी काम सुरू करेल त्यालाच माहिती.' खासदार इम्तियाज म्हणाले, ‘आता सहा मंत्रिपदे मिळालीत. त्यामुळे आता खड्ड्यांचे हे शेवटचे वर्ष असेल,’ असा टाेमणा मारला. मंत्री सावेंनी उत्सव आला की मनपाला खड्डे आठवतात. आता शेवटच्या तीन दिवसांत खड्डे बुजवतील. पण खड्डे बुजवणे म्हणजे माती टाकणे नव्हे,’ असा टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...