आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा रस्ता:अशोक चव्हाणांना शिंदे सेनेचाही पर्याय, मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील स्नेहभोजनात काँग्रेसच्या फुटीवर चर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून आहे. मात्र त्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. मराठवाड्यातील एकूण राजकारण आणि उद्धव सेनेचा प्रभाव लक्षात घेता चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेशाचीही तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त वर्षा बंगल्यावर मंगळवारी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यात या संभाव्य प्रवेशाची चाचपणी झाली.

प्रशासनावर पकड, शरद पवारांचा विरोधक आणि सर्वसमावेशक मराठा समाजाच्या नेत्याचा शोध भाजपकडून सुरू आहे. त्यात दिल्लीश्वरांनी अशोकराव हेच योग्य असल्याचे म्हटल्यावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्राथमिक बोलणी केली. महसूलमंत्री विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेटीगाठी सुरू केल्या. पण त्यात पुढे ठोस काही झाले नाही. याविषयी सूत्रांनी सांगितले की, स्नेहभोजनात काँग्रेस फुटीविषयी चर्चा झाली. महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे राजकारण, मराठा समाजाचे संख्याबळ, आर्थिक-सामाजिक स्थिती आणि उद्धव सेनेचा प्रभाव हे सगळे लक्षात घेऊन चव्हाण यांनी शिंदे सेनेत प्रवेशाचीही तयारी दाखवली आहे. भाजपमध्ये प्रवेशाने आपण तिसऱ्या फळीत जाऊ. काँग्रेसमधील आणखी किमान १५-२० आमदारांना सोबत न्यावे लागेल. त्यापेक्षा शिंदे सेनेत दुसऱ्या फळीत महत्त्वाची जागा मिळेल. काँग्रेसच्या पाच-सात आमदारांना सोबत घेतले तरी ते पुरेसे आहे, असा बहुधा चव्हाण यांचा विचार चालला आहे. तो त्यांनी मराठवाड्यातील शिंदे सेनेच्या एका आमदाराकडे व्यक्तही केला. चव्हाणांनी शोधलेल्या नव्या रस्त्याला भाजपचाही विरोध नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

खासदार इम्तियाज जलील, अबू आझमींसह आठवले यांचीही वर्षा बंगल्यावर उपस्थिती भोजनातून उद्धव गटाला शिंदे यांचा थेट संदेश स्नेहभोजनास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे गटाला एकाकी पाडण्यासाठी शिंदे यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विरोधकांतील काही महत्त्वाच्या आमदारांना आपल्यासोबत जोडण्यासाठी शिंदे यांची ही डिनर डिप्लोमसी असल्याचे स्पष्ट दिसते.

प्रत्युत्तराच्या भानगडीत पडू नका उद्धव ठाकरे गट दसरा मेळावा आणि इतर मुद्द्यांवर शिंदे सेनेवर कठोर हल्ला करत आहे. त्याला कसे सामोरे जावे, काय करावे, या मुद्द्यावरही स्नेहभोजनात चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना मीडियामध्ये भरपूर जागा दिली जात आहे. पण हे फार काळ चालणार नाही. ते महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा करत असले तरी त्यांना ते प्रात्यक्षिकदृष्ट्या शक्यच नाही. म्हणून लोकांमध्ये भरपूर मिसळा. लोकांशी बोलत राहा. हिंदुत्वाची आपली बाजू लोकांनाच समजावून सांगत राहा. उद्धव गटाला फार उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. त्यापेक्षा लोकांची कामे करा, असा सल्ला शिंदे गटातील वरिष्ठांनी आमदारांना दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...