आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतील बंडात सुरुवातीपासून भक्कम साथ देणाऱ्या 40 आमदारांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या आमदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पहिल्या टप्प्यात नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात ते जोरदार शक्तिप्रदर्शन करतील. 29 जुलै रोजी दादा भुसे (मालेगाव) व सुहास कांदे (नांदगाव) या मतदारसंघांचा दौरा शिंदे यांनी केला. आता शनिवार व रविवारी ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या दोन दिवसांत ते संजय शिरसाट, संदिपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे आणि अब्दुल सत्तार या आमदारांच्या मतदारसंघांत मेळावे, रॅली काढतील. औरंगाबादेत काही नवीन नियुक्त्याही जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्याचा आढावाही मुख्यमंत्री घेणार आहेत. रविवारी सकाळी विभागीय आयुक्तांसोबत बैठकीनंतर ते औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही काही घोषणा करण्याची आशा आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार : अर्जुन खोतकर
शिवसेना नेते अर्जुन खोतकर, खासदार श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्यात शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. खोतकर हे ३१ जुलै रोजी शिंदे गटात येणार असल्याचे या वेळी सत्तार यांनी जाहीर केले. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय घेईन, असे खोतकर यांनी म्हटले आहे.
राज्यकर्त्यांना प्राधान्यक्रम कळायला हवा : शरद पवार
विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागात दौऱ्यावर आहेत. राज्यकर्त्यांनी प्राधान्य कशाला द्यायला हवे हे त्यांना कळायला हवे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय हातात आल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही. याबाबतची परिस्थिती चिंताजनक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
आदित्यपेक्षा मोठे शक्तिप्रदर्शन, ठाकरेंचे शिलेदार हेच लक्ष्य
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एक आठवड्यापूर्वी नाशिक, औरंगाबादेत मेळावे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तब्बल ४० आमदार, पदाधिकाऱ्यांच्या फुटीनंतरही अजूनही मोठ्या प्रमाणात सामान्य शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचा संदेश यातून गेला. त्यामुळे औरंगाबाद व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आधीच मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे हे आमदार व त्यांचे समर्थक हवालदिल आहेत. या पार्श्वभूमीवर समर्थकांना पाठबळ देण्यासाठी आदित्य यांच्यापेक्षाही मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री या दौऱ्यातून करणार आहेत. हे दोन्ही जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे येथील जास्तीत जास्त शिवसैनिक व पदाधिकारी आपल्याकडे खेचून ‘खरी शिवसेना आमचीच’ यावर शिक्कामाेर्तब करण्याचाही शिंदेसेनेचा प्रयत्न असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.